सार्वजनिक मंत्री नीलेश काब्राल यांची माहिती, चांदेल पाणी प्रकल्पाला दिली भेट
पेडणे : चांदेल येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाणी प्रकल्पाकरीता लागणारे एम.बी.आर उभारण्यासाठी जमिनीची गरज आहे. त्यासाठी पेडणे तालुक्याचे दोन्ही आमदार आणि स्थानिक सरपंच, पंचांनी जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न केल्यास एक वर्षाच्या आत पेडणे तालुक्याची पाणी समस्या आपण सोडवणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी चांदेल येथील पाणी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिले. मंत्री निलेश काब्राल यांनी पेडणे मतदारसंघाचा बुधवारी दौरा करत पेडणे तालुक्यातील पाण्याच्या तीव्र टंचाईची दखल घेतली. तालुक्यात पाण्याच्या समस्ये बाबत हल्लीच झालेल्या विधानसभा अधिवेशनात आमदार प्रवीण आर्लेकर आणि आमदार जीत आरोलकर यांनी पाण्याच्या समस्येबाबत प्रश्न केला होता. पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला भेट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण आज चांदेल येथे भेट दिल्याचे काब्राल यांनी सांगितले. पेडणेत पाणी समस्या मोठी असल्याची जाणीव आपणाला पूर्णपणे असून यासाठी आपण आज पेडणे तालुक्यात आलो आहे. पेडणेतील सरपंच, पंच तसेच आमदार प्रवीण आर्लेकर आणि आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घेऊन या पाणी प्रकल्पाला लागणारी जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आतापासूनच कामाला लागल्यास आपण एक वर्षाच्या आत पेडण्याची पाणी समस्या सोडवतो व प्रत्येक घराला किमान चार तास पाणी देण्याचे आश्वासन यावेळी काब्राल यांनी दिले. यावेळी चंदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी बाळकृष्ण फडते, पेडणे पाणी विभागाचे अभियंते सोमा नाईक, साहाय्यक अभियंते संदीप मोरजकर ,साहाय्यक अभियंता गौरेश ठाकूर, चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस, कासरवर्णे सरपंच नवनाथ नाईक, तांबोसे-मोप-उगवेचे सरपंच सुबोध महाले, खाजने-अमेरे-पोरस्कडे सरपंच निशा हळणकर, तोरसे सरपंच पार्थना मोटे, इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर, चांदेल उपसरपंच ऊचिरा मळीक, पंच बाळा शेटकर, पंच प्रजय मळीक, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, पंच प्रदीप परब, विविध पंचायतीचे सदस्य तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.
पेडणे तालुक्यात 24 पाण्याच्या टाक्या बांधणार
पेडणे तालुक्यात एकूण 24 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. पाण्याची समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यातल्या दहा टाक्यांचे काम पूर्ण असून चार टाक्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहेत. 15 एम एल डी पाणी प्रकल्प दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. मात्र या पाणी प्रकल्पातून गावांना पाणी सोडण्यासाठी लागणारी जागा स्थानिकांनी देण्याची गरज आहे. जागा उपलब्ध झाल्यास हा प्रश्न एका वर्षाच्या आत सुटेल असे यावेळी नीलेश काब्राल यांनी सांगितले. चांदेल येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या 15 एम. एल. डी पाणी प्रकल्पाकरीता एमबीआर बांधण्यासाठी जागेची गरज असून ती जागा देण्यासाठी जलस्रोतमंत्र्यांनी तेथील गाड कुटुंबियांना एक सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन अजून पर्यंत पाळले नसल्याने गाड कुटुंबियांनी सदर जागा दिलेली नाही. सरकारी नोकरी व सरकारी नियमानुसार जागेचा दर द्यावा, अशी त्यांची मागणी असल्याचे चांदेलचे सरपंच तुळशीदास गावस यांनी सांगितले. यावेळी बोलताना मंत्री काब्राल म्हणाले की एक काय ते मिळेल दोन्ही गोष्टी मिळणार नाही. नोकरी पाहिजे तर पैसे मिळणार नाहीत. जागेची समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांनी व स्थानिक आमदार यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दोन्ही आमदार तसेच अधिकारी आणि अभियंते आणि इत् वरार्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचे आदेश दिले. पेडणे तालुक्यात पाणी समस्या ही गंभीर आहे. त्यासाठी तुम्ही ती सोडविण्यासाठी त्या पद्धतीने काम करावे. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नको आहेत. चांदेल पाणी प्रकल्पातून 15 एम. एल. डी पाणी सोडण्यात येते. मात्र ते पाणी कमी मिळते असे पत्रकारांनी मंत्री काब्राल यांना सांगितले. यावर काब्राल यांनी असे का होते असा प्रश्न अभियंते सोमा नाईक यांना केला. याचा शोध घ्या घेण्याचे सांगून मंत्री काब्राल यांनी याबाबतचा अहवाल आपल्याला लगेच द्यावा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, मंत्री नीलेश काब्राल यांनी आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर यांच्या सोबत तुये येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याची प्रकाल्पाची पहाणी केली.









