म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांचा सवाल
प्रतिनिधी /म्हापसा
विरोधी पक्षनेते मायकल लोबो भाजपात असताना मंत्री होते. ते आता काँग्रेसमधून परत भाजपात येण्यास पाहत असतील, तर ते काँग्रेसमध्ये गेलेच का होते? याचा त्यांनी खुलासा करावा. ते परत येत असतील तर अवश्य यावे. त्यांना पुन्हा भाजपात घ्यायला पाहिजे, तेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी भाजपचे पदाधिकारी, आमदार, कार्यकर्त्यांनी त्यांच्या ‘घरवापसी’ला मान्यता द्यावी लागेल, असे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले,
वास्तविक ते भाजपचे वरिष्ठ तसेच अनुभवी नेते असल्याने त्यांनी भाजपला सोडायला नको होते. आज ते राज्यात भाजपच्या सरकारातील वरिष्ठ मंत्री बनले असते, असेही डिसोझा म्हणाले.
टार्गेट करण्याचा प्रश्नच नाही
मायकल लोबो यांच्या व्यवसायाचा सर्व व्यवहार पारदर्शक आहे, तर त्यांना कुणी टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्यांची कागदपत्रे बरोबर नसतील तर त्यांच्यावर कारवाई होईलच. कायद्यात काय आहे तेच होणार आहे. आपले जर हॉटेल असते व सर्व पत्रव्यवहार सुरळीत असता तर आपण नगरनियोजन किंवा आरोग्य अधिकाऱयांना तुम्ही कारवाई करू शकता, असे स्पष्ट केले असते. आपण आमदार आहे म्हणून काहीही वाट्टेल तसे करू शकत नाही, असेही डिसोझा म्हणाले.
तक्रारी आल्यानेच चौकशी
मायकल लोबो भाजपात होते तेव्हा त्यांच्यावर कोणतीच कारवाई नव्हती, मात्र आता काँग्रेसमध्ये जाऊन विरोधी पक्षनेते बनल्यावरच त्यांना टार्गेट केले जात आहे. यावर बोलताना डिसोझा म्हणाले की, पूर्वी कुणीच तक्रार केली नव्हती. मात्र आता त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. म्हणून कारवाई होत असावी. कदाचित ते परवाना घेण्यास विसरले असणार. त्यांच्याकडे कोणता परवाना नाही असे आपण म्हणत नाही. सर्वकाही कारवाईतून स्पष्ट होणार आहे, असेही ते म्हणाले.
नगरनियोजन खात्याचे स्वागत
सध्या जी नगर नियोजन खात्याची राज्यात जमिनी विषयी जी कारवाई सुरू आहे ती योग्य दिशेने जात आहे. आपण त्याचे स्वागत करतो. आपण याबाबत मुख्यमंत्री, नगर नियोजनमंत्र्यांना भेटलो आहे. गुन्हा करणाऱयावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जेणेकरून जनतेचा प्रशासनावर विश्वास बसेल असे त्यांनी स्पष्ट केले.
जमीन मालकांनी आपापल्या जमिनीची कागदपत्रे पडताळून पाहावी
जे कोणी गोव्यात नाहीत, कुणी विदेशात आहेत त्यांनी नगर नियोजन वा संबंधित खात्यात जाऊन आपापल्या जमिनीची चौकशी करावी असे आवाहन म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी केले आहे. कुणी जमीन दुसऱयांच्या नावे करून परस्पर विकली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकतानगर येथे आपल्या नातेवाईकांची जमीन होती ती परस्पर अन्य कुणाच्या नावे करुन विकल्याचे आढळून आले आहे. सरकारने यावर योग्य कारवाई करून मूळ मालकाला ती जमीन द्यावी, असे ते म्हणाले.
उपसभापतीपदासाठी आपण इच्छुक आहात काय असा प्रश्न त्यांना केला असता प्रथम त्यांनी बोलण्याचे टाळले. नंतर म्हणाले की उपसभापतीबाबत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही ती 11 जुलैपर्यंत होईल. त्यामुळे प्रथम अधिसूचना येऊ द्या, नंतर बोलू असे ते म्हणाले.









