राजस्थानातील प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे वक्तव्य
राजस्थानात निवडणूक प्रचाराने वेग पकडला असून बुधवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अल्वर जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात जाहीरसभेला संबोधित केले आहे. योगींनी यावेळी उदयपूर येथील कन्हैयालाल हत्येचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस सरकारला लक्ष्य केले. कन्हैयालाल यांची हत्या कशी झाली हे जनतेला माहिती आहे, परंतु ही घटना उत्तरप्रदेशात झाली असती तर काय घडले असते हे देखील लोक जाणून असल्याचे म्हणत योगींनी काँग्रेसकडून दहशतवादाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे.
राजस्थानचा स्वत:चा गौरवशाली इतिहास आहे, परंतु काँग्रेसचे नेते या राजस्थानच्या इतिहासाला कलंकित करू पाहत आहेत. काँग्रेसने देशाला काश्मीरची समस्या दिली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 हद्दपार करत दहशतवादाच्या शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करविला होता. परंतु काँग्रेसला अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यात रस नव्हता. मोदी आणि योगी आले आणि मंदिर उभारणीस प्रारंभ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. समस्या सोडविणारे हेच डबल इंजिनचे सरकार आहे. जेथे भाजपचे डबल इंजिनचे सरकार आहे तेथे विकासयोजना प्रभावीपणे लागू करण्याचे काम सुरू आहे. उत्तरप्रदेशात आम्ही 2.75 कोटी गरीबांना शौचालये बांधून दिली आहेत. तर 55 लाख गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. 1 कोटी 75 लाख कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. उत्तरप्रदेशात 10 कोटी लोकांना आरोग्य विमा पुरविण्यात आल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
तुष्टीकरणाचा खेळ कधीपर्यंत चालणार
राजस्थानात तुष्टीकरणाचा खेळ कधीपर्यंत चालणार? गेहलोत हे गोस्तकरांचे गुणगान गात असून पुजाऱ्यांच्या मंदिरांवर बुलडोझर चालवत आहेत. राजस्थानला आता मजबूत नेतृत्वाची गरज आहे. राज्यातील तुष्टीकरण संपविले जावे. कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये तर गोतस्करांना 25 लाख रुपये का देण्यात आले असा प्रश्न योगींनी उपस्थित केला आहे.
युपीत बुलडोझर करतोय काम
उत्तरप्रदेशात महिलांना सुरक्षित वाटत आहे. महिलांची छेड काढण्याचे धाडस आता कुणी करत नाही. तरीही कुणी दुस्साहस केले तर बुलडोझर स्वत:चे काम करतो. जानेवारीत अयोध्येत राम मंदिरासोबत राष्ट्रवाद समोर येणार आहे. पंतप्रधान मोदींनी केंद्रात मजबूत नेतृत्व प्रदान केले आहे. तालिबानी मानसिकता संपवून राष्ट्रवादाला विजयी करायचे असल्याचे योगींनी सभेत म्हटले आहे.









