एका कावळ्याला तहान लागलेली आहे. तो एका उंच मडक्याच्या तोंडावर बसलेला आहे. आत पाणी आहे, पण ते तळाशी आहे. मग कावळा मडक्यात एक एक खडा टाकून पाणी वर वर आणतो आणी आपली तहान भागवतो, ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी ऐकलेली असतेच. पण ती काल्पनिक असल्याचे आपण समजतो. पण एका कावळ्याने ही गोष्ट काल्पनिक असून सत्य असल्याचे सिद्ध केल्याचे दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ आहे.
दोन परीक्षानळ्यांमध्ये अर्धे पाणी भरलेले दिसून येते. एका परीक्षानळीच्या तळाशी एक धान्याचा दाणा ठेवलेला आहे. कावळ्याला तो दाणा खायचा आहे. पण तो चोचीने काढून घेता येण्यासारखा नाही. त्यामुळे कावळा त्या नळीत एक दगड टाकतो. पाणी वर येते, तसा तो दाणाही वर येतो आणि कावळा तो दाणा खातो, असे या व्हिडीओत पहावयास मिळते. याचाच अर्थ असा की, फार पूर्वी रचली गेलेली कावळा आणि मडके ही गोष्ट खोटी नाही, याचा प्रत्यय या व्हिडीओवरुन येतो. अर्थात, एक बदल मात्र आहे. तो म्हणजे गोष्टीतील कावळ्याला पाणी हवे असते. तर येथे त्याला दाणा हवा असतो. हा किरकोळ फरक जर सोडला तर ती गोष्ट खरी होती, असे म्हणता येते.









