कोल्हापूर :
शक्तिपीठच्या मुद्यावर मी शेतकऱ्यांसोबतच आहे. या महामार्गाच्या समर्थनार्थ अचानक काही शेतकरी पुढे येत आहेत. आता त्यांनीच ठरवायचे काय करायचे आहे. जर याबाबत शेतकरीच आपली भूमिका बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरूवारी विविध विकासकामांचा आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासोबत आजही शेतकऱ्यांसोबतच आहे. पण शेतकरीच याबाबतची आपली भूमिक बदलत असतील तर माझाही नाईलाज आहे. काही लोकांचा समृद्धी महामार्गालाही विरोध होता. परंतू महामार्ग झाल्यानंतर त्याचे फायदे समोर आले. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाबाबत आता शेतकऱ्यांनीच निर्णय घ्यावा.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. लाडक्या बहिणीची फसवणूक करणार नाही. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 वरून 2100 रूपये करणे आणि शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. याची काळजी कोणी करण्याची गरज नाही, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनचे यंदाचे बजेट सादर करणे ही तारेवरची कसरत होती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कौशल्याने तारेवरची कसरत पार केली, जिह्यातील महायुतीच्या साखर कारखान्यांच्या कर्जाला शासनाने केवळ हमी दिली आहे. सीपीआरमधील डॉक्टर्स मारहणीप्रकरणी मुश्रीफ यांनी सीपीआरमधील सर्व डॉक्टरांना सुरक्षा दिली जाईल, असे सांगितले. यावेळी कागल शहरातील शाहू हॉलवरून मुश्रीफ यांनी समाजहितही पाहिले पाहिजे केवळ इस्टेट सांभळणे हे काम नाही, असा टोला समरजित घाटगे यांचे नाव न घेता लगावल.
- संजय राऊत यांच्यावर पलटवार
वर्धा ते गोवा शक्तिपीठ महामार्ग कंत्राटदारांसाठी केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत निवडणुकीपूर्वी तुम्ही काय घेतले काय नाही हे संजय राऊत यांना माहिती असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सादर करावे.
- जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावरील मोर्चावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘माझे काही खरे नाही’ असे विधान केले होते. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील नाराज आहेत, हे नक्की आहे, नागपूरला एकदा त्यांनी माझं मन कशात लागत नाही, असे मला बोलून दाखवले होते. सत्तेत नसताना 5 वर्ष पक्ष टिकवणे हे फार अवघड आहे, याची बहुदा त्यांना कल्पना आली असावी.
- मुंडे निर्दोष झाल्यास पुन्हा मंत्रिपद
धनंजय मुंडे यांचे रिकामे झालेले खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. धनंजय मुंडे निर्दोष झाले तर पुन्हा ते खाते त्यांना द्यावे लागेल, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.








