वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने जिंकल्यास राज्यात जातीय आधारावर जनगणना केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. अन्य मागासवर्गियांची नेमंकी संख्या किती हे निश्चित करण्यासाठी ही जनगणना केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताचे कायदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नोकरशहा निर्माण करीत आहेत. लोकप्रतिनिधींना हे कायदे करण्याच्या प्रक्रियेत कोणतेही स्थान नाही. देश केवळ 90 अधिकारी चालवत आहेत. भाजपचे खासदार आणि आमदारांना कायदा करण्याच्या प्रक्रियेत स्थान नाही. संघाच्या सांगण्यावरुन भाजप सरकार मूळ मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे काम करीत आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात बोलल्यामुळे आपले संसद सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. महिला विधेयक लागू होण्यास अजून 10 वर्षे लागणार आहेत, असाही आरोप त्यांनी केला. मात्र, काँग्रेसच्या अनेक दशकांच्या सत्तेत महिला आरक्षण विधेयक का लागू करण्यात आले नाही, याचे उत्तर त्यांनी दिले नाही.









