मद्यप्रेमी संघर्ष समितीचे आगळेवेगळे आंदोलन : सुविधा पुरविण्याची मागणी
बेळगाव : मद्यप्रेमींचे कौटुंबिक, सामाजिक जीवनमान सुधारले पाहिजे. यासाठी शासनाने सुविधा पुरवाव्यात. शिवाय मंत्रिमंडळ स्तरावर याबाबत ठोस निर्णय घ्यावा, यासाठी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीतर्फे गुरुवारी आंदोलन छेडले. शिवाय याबाबतचे निवेदन विधानसौध परिसरात सादर केले. मद्यपींना समाजात वावरताना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. कर देण्यात मद्यपी आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना सुविधा पुरविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय मद्यपींनी आम्हाला दारुडा म्हणू नका, मद्यप्रेमी असे आदराने बोलवा, अशी मागणीही केली आहे. राज्यातील बहुतांश सरकारी कार्यक्रमांना अबकारी कराच्या माध्यमातून निधी दिला जातो. त्यामुळे मद्यपानप्रेमींच्या सोयी-सुविधांसाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मद्यप्रेमींच्या मुलांना शिक्षणात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मद्यप्रेमी आजारी पडल्यास वैद्यकीय खर्च सरकारने पुरवावा, तसेच मद्यप्रेमी कॉर्पोरेशन बोर्डाची स्थापना करून मद्यप्रेमींना दिलासा द्यावा, अशी मागणीदेखील मद्यप्रेमींनी केली आहे. मद्यप्रेमीचा दारूसेवनाने मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करावे, मद्यप्रेमी कुटुंबीयांच्या लग्नकार्यासाठी 2 लाख रुपये प्रोत्साहन धन देण्यात यावे, मद्यप्रेमी विविध बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये जेवतात, त्यामुळे त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करावेत, त्याबरोबरच एमआरपीपेक्षा अतिरिक्त दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा
कामगारमंत्री संतोष लाड यांनी या आंदोलनकत्यर्चीं भेट घेतली असता मद्यप्रेमींनी त्यांच्यासमोर मांडलेल्या मागण्या पाहून त्यांना हास्य आवरेनासे झाले. शिवाय परिसरातील पोलीस आणि नागरिकांनी देखील आंदोलनकत्यर्किंडे गर्दी केली होती. मद्यपींच्या मागण्या पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटे घातली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची दिवसभरात चर्चा सुरू होती.









