Home Minister Amit Shah बिहारमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर अनेक भागात दंगली उसळल्या. सासाराम, आणि बिहार शरिफमध्ये दंगेखोरांना मोकळीक मिळाली असल्याचा दावा करून 2025 मध्ये भाजप सत्तेत आल्यावर दंगलखोरांना उलटे टांगले जाईल असा इशारा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. ते बिहार दौऱ्यावर असून एका जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला.
रामनवमीच्या पार्श्वभुमिवर बिहारमधील नालंदा, बिहार शरीफ आणि सासाराम भागात 31 मार्च रोजी दंगली उसळल्या. या दंगलग्रस्त भागात अमित शहा भेट देणार होते. मात्र, परिसरातील तणावामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला. नवादा येथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “सासाराम आणि बिहार शरीफमध्ये दंगलखोर धुमाकूळ घालत आहेत. 2025 मध्ये बिहारमध्ये भाजप सरकार आल्यास त्यांना उलटे टांगण्यात येईल.”
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडवत ते म्हणाले, “जंगलराज लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे सरकार बिहारमध्ये कधी शांतता प्रस्थापित करू शकणार नाही. सत्तेची भूक लागल्याने नितीशकुमार लालूप्रसाद यादवांच्या मांडीवर बसले आहेत. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी नेहमीच तुकडीकरणाचे धोरण आवलंबले ज्यामुळे दहशतवाद वाढण्यास मदत झाली. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी कलम ३७० रद्द केले आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली. आम्ही हे ‘महागठबंधन’ सरकार उखडून टाकू.” असेही ते म्हणाले.