भटकी कुत्री नियंत्रणासाठी पंचायतराज खात्याकडून जिल्हा पंचायतीला आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नसबंदी करण्यासाठी तालुकास्तरीय समितीची रचना करून कुत्र्यांच्या पैदाशीवर नियंत्रण ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तर कुत्रा चावल्यास उपचार खर्च व कुत्रा चावून एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याची भरपाई ग्राम पंचायतीने द्यावी लागणार आहे, असा आदेश पंचायतराज खात्याकडून जिल्हा पंचायतीला बजावण्यात आला आहे.
शहरासह ग्रामीण भागामध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नगरपालिका व महानगरपालिकेच्या व्याप्तीमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. यासाठी निविदा मागवून बंदोबस्त केला जात आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंचायतराज खात्याकडून मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
तालुकास्तरीय समितीची रचना करून प्रशासकीय व आर्थिक जबाबदारी स्वीकारून याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. महानगरपालिकांच्या व्याप्तीमध्ये राबविण्यात येणाऱ्या नसबंदी मोहिमेप्रमाणेच ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये तालुका पंचायतीकडून अशाप्रकारे मोहीम राबविण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांकडून हल्ला करण्यात आल्यानंतर जखमींना उपचार खर्च, भरपाई तसेच मृत झाल्यास मरणोत्तर भरपाई देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुका पंचायत कार्यालयात भटकी कुत्री नियंत्रण केंद्र निर्माण करावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीची व्यवस्था उपलब्ध करून ठेवण्यात यावी, ग्राम पंचायतींनी आपल्या व्याप्तीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी शुल्क भरून तालुकास्तरीय केंद्राची मदत घ्यावी. प्रत्येक तालुक्यातील भटक्या कुत्र्यांची गणती पशुसंगोपन खात्याच्या माध्यमातून करण्यात यावी. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घ्यावी, अशी सूचना या आदेशातून करण्यात आली आहे.
कुत्रा चावून मृत्यू झाल्यास 1 लाख भरपाई
भटक्या कुत्र्याने चावल्यानंतर 1 दात लागल्यास 2 हजार भरपाई, 1 हजार रुपये वैद्यकीय खर्च, गंभीर दुखापत झाल्यास 3 हजार रुपये भरपाई व 2 हजार रुपये वैद्यकीय खर्च, अनेकवेळा चावा घेतल्यास 10 हजार रुपये भरपाई, 5 हजार वैद्यकीय खर्च, कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावल्यास लहान मुलांसाठी 50 हजार, प्रौढांसाठी 1 लाख भरपाई, अंत्यक्रियेसाठी 5 हजार रुपये खर्च व वैद्यकीय खर्च देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे.









