ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल, असा खोचक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
दानवे हिंगोलीत मीडियाशी बोलत होते. संतोष बांगर यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल दानवे यांना विचारले असता, बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. हे आतापर्यंतचं सर्वात अपयशी सरकार आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यावर सरकारला वचक ठेवता आला नाही. शेतकरी अडचणीत आहे. त्यांना अतिवृष्टीची मदतही मिळालेली नाही. हे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणारं असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले होते बांगर?
मराठवाडय़ातील नेता आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचा असल्याचं अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे मला शंभर टक्के मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल. तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका, असं संतोष बांगर यांनी म्हटले होते.








