एका अंतरिम याचिकेवर सरन्यायाधीश नाराज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी केरळमधील बंदिवान हत्तींच्या मृत्यूशी निगडित एक अंतरिम याचिका सादर करण्यात आली. सरन्यायाधीशांनी यावर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. लक्ष वेधणारे हजारो मुद्दे महत्त्वाचे असू शकतात, परंतु ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज ठप्प होईल अशा प्रकरणांवर आम्ही सुनावणी करू शकत नसल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
हे स्थानिक प्रकरण असून त्याला उच्च न्यायालय हाताळू शकते. जर उच्च न्यायालयाने एखादी मोठी चूक केल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आम्ही आहोत. देशात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे? आम्ही पूर्ण देशात उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांचे मायक्रो मॅनेजमेंट करू शकत नाही असे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायाधीश पारदीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
तत्काळ सुनावणीची मागणी
वरिष्ठ वकील सी.यू. सिंह यांनी केरळमध्ये नियमांचे उल्लंघन करत बंदीवान करण्यात आलेल्या हत्तींच्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित करत तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. फेब्रुवारी 2019-नोव्हेंबर 2022 दरम्यान अधिक काम आणि उपेक्षेमुळे केरळमध्ये 135 हून अधिक बंदीवान हत्तींचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर सरन्यायाधीशांनी त्यांना फटकारत उच्च न्यायालयात जा, तेथील न्यायाधीश स्थिती आणि त्याच्या प्रभावाबद्दल जाणून असल्याचे याचिकाकर्त्याला सुनावले आहे.
केरळमध्ये बंदीवान हत्तींच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. 2008 मध्ये राज्यात सुमारे 900 बंदीवान हत्ती होते, परंतु आता ही संख्या केवळ 448 राहिली आहे. मागील 5 वर्षांमध्ये 115 बंदीवान हत्तींचा मृत्यू झाला आहे. बंदीवान हत्तींवरील क्रूरता वाढत असल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सचे सचिव व्ही.के. वेंकटचल यांनी दिली आहे. केरळमध्ये दरवर्षी सरासरी 25 बंदीवान हत्तींचा मृत्यू होतो. बंदीवान हत्तींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण त्याच्या मालकांकडून दिली जाणारी खराब वागणूक असल्याचे केरळ वन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
अंतरिम याचिकांमुळे नाराजी
प्रलंबित खटल्यांच्या स्थितीदरम्यान बेहिशेबी पद्धतीने सादर होणाऱ्या अंतरिम याचिकांमुळे सरन्यायाधीश नाराज झाले होते. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका समजून घ्या. अशाप्रकारच्या अंतरिम याचिकांवर विचार करणे शक्य होणार नसल्याचे सरन्यायाधीशांनी कोर्टरुममध्ये उपस्थित वकिलांना उद्देशून म्हटले आहे.









