सातारा :
माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यामध्ये परतीचा पाऊस मोठया प्रमाणात पडतो. परंतु पावसाळा सुरु होण्याच्या आधीच अवकाळीने या तालुक्यात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीसाठी शासनाने निकष लावले आहेत. ते बदलावेत. लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गट नव्याने पदाधिकारी निवडी करुन नव्या जोमाने जिह्यात कामाला लागेल, असेही त्यांनी सुतोवाच केले.
साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तेजस शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विजय बोबडे, अतुल शिंदे, शफीक शेख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, पावसाळा सुरु व्हायचा आहे. तत्पूर्वीच सातारा जिह्यातील दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांना अवकाळीने झोडपून काढले आहे. या भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो. हा अवकाळी पाऊस जिह्याच्या सर्वच तालुक्यात झाला आहे. त्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्याची प्रक्रिया सुरु आहे. असे असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासासाठी शासनाकडून काही निकष लावले गेले आहेत. यापूर्वीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तीही दिली गेली पाहिजे. पूर्वीच्या पंचनाम्यात किती शेतकरी मदतीवाचून राहिले आहेत, याचीही माहिती आम्ही प्रशासनाकडून मागवली आहे. आताही जो निकष लावला आह। तो शिथिल करुन हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.
शासनाकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत, हेही आम्हाला माहिती आहे. परंतु काहीही करुन शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत ते म्हणाले, राज्याच्या बजेटमध्ये सातारा जिह्याला मदतीची वाढ मिळावी. जिह्यात चार मंत्री आहेत. त्याबाबत त्यांनी गांभीर्याने घ्यावे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हे जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिह्यात नवीन धरणे बांधण्यापेक्षा आहे त्या धरणांचे कालवे दुरुस्त केले तर गळतीद्वारे वाया जाणारे पाणी वाचेल, त्याकरता नव्याने सोळशीसारखी धरणे बांधण्यापूर्वी सरकारने कालव्यांची कामे करावीत. त्यामुळे चार टीएमसी पाणी वाढून ते शेतीला उपयोगात आणता येईल, अशीही सूचना मांडली. तसेच त्यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिह्यात सत्ताधाऱ्यांनी कामे सुरु केली आहेत. त्या कामामध्ये काही तांत्रिक दोष आहेत. एकाच कंपनीकडे ठेके दिलेले आहेत. सुरुर-वाई रस्ता, महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्याचे काम, पाटण रस्ता, कोरेगाव रस्ता अशा सर्वच रस्त्याची कामे वेगाने हाती घेतली असली तरीही होत असलेली कामे चांगल्या दर्जाची होत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. ही कामे निवडणूका डोळयासमोर ठेवूनच केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
- पुन्हा नव्या जोमाने पक्ष काम करणार
शुन्यातून भरारी घेण्याची ताकद पक्षात आहे. पुढच्या आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच सेलच्या पदाधिकारी निवडी करत आहोत. त्यामध्ये सर्वच पदाधिकारी अॅक्टीव्ह असतील. 100 जणांची फळी उभी केली जाणार आहे. पुन्हा नव्या जोमाने पक्ष काम करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचे चित्र तुम्हाला पहायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- कोरेगावकरांची घेतली फिरकी
कोरेगावातील काही मंडळी रस्त्याच्या कामाप्रश्नी निवेदन द्यायला आल्याचा प्रश्न त्यांना छेडला असता ते म्हणाले, रस्त्याचे काम रखडवले कोणी, त्याचा शोध घ्या. रखडवणारेच आंदोलन करत असतील तर नगरसेवक आले असतील तर त्यांनी विचारावे. सरकार त्यांचे आहे ना, अशा शब्दात त्यांनी त्यांची फिरकी घेतली.
- ऑपरेशन सिंदूरवरुनही सत्ताधाऱ्यांवर टीका
ऑपरेशन सिंदुरबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाने केली आहे. परंतु त्यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.








