काँग्रेसचा सरकारला इशारा : मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
पणजी ; पिण्यासाठी वापरणाऱ्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून सांडपाणी वाहून नेत असताना सांकवाळ येथे जागरूक नागरिकांनी तो टँकर पकडल्यानंतर राज्यभरात गदारोळ माजला. त्यानंतर काँग्रेस पक्षाने हा विषय गांभीर्याने घेत बरीच जागऊकता निर्माण केली. मात्र या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत आजपर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई न केल्यास टँकर रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काँग्रेस पक्षाने आतापर्यंत साबांखा, अन्न व औषध प्रशासन, जलस्रोत, वाहतूक तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यासारख्या विविध खात्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन सदर विषय त्यांच्यासमोर मांडला. परंतु यापैकी एकाही खात्याने त्या प्रकाराची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार खरोखरच धक्कादायक आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कागदोपत्री पुरावे व चित्रफीत सादर केली. तेव्हा सदर प्रकाराने मुख्यमंत्रीही स्तब्ध झाले असे, पाटकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेलेल्या या शिष्टमंडळात पाटकर यांच्यासमवेत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, सुभाष फळदेसाई, अमरनाथ पणजीकर, ओर्विल दोरादो, जितेंद्र गांवकर, सावियो डिसिल्वा, श्रीनिवास खलप, विरियाटो फर्नांडिस, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक, ओलेंसियो सिमोईश, आदींचा समावेश होता.
न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी
या भेटीवेळी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे टँकर व्यवसायावर देखरेख आणि नियमन करण्यासाठी नोडल एजन्सी तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी केली आहे, असे पाटकर यांनी सांगितले.
केवळ तीनच तालुक्यांमध्ये टँकरची नोंदणी
जलस्रोत खाते पेडणे, बार्देस आणि तिसवाडी या केवळ तीनच तालुक्यामध्ये टँकरचालकांकडून महसूल वसूल करते ही धक्कादायक बाब आहे. गोव्यात व्यावसायिक वाहने म्हणून वाहतूक खात्याकडे एकही टँकर नोंदणीकृत नाही. आम्ही वाहतूक संचालकांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे केवळ 26 व्यावसायिक दुचाकींची नोंदणी असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती पाटकर यांनी दिली.
महत्त्वाची यंत्रणाही टँकर्सबाबत अनभिज्ञ
टँकरमधून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे कोणतेही अधिकार अन्न व औषध प्रशासनाला नाहीत. टँकरद्वारे जमा होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावण्यात येते यावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असे पाटकर यांनी निदर्शनास आणले. या सर्व बाबी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, असे पाटकर पुढे म्हणाले. पाणी वाहतुकीसंबंधी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांना खोटी व दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात आली आहेत हेही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस शिष्टमंडळाने यावेळी पणजी स्मार्टसिटी कामातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार, बागा नदीत सांडपाणी सोडण्याचे प्रकार, स्वस्त धान्य दुकानांना बुरशीयुक्त तांदळाचा पुरवठा यासारख्या अनेक विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे पणजीकर यांनी सांगितले.









