सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण टिप्पण्या
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विवाहित महिलेने विवाहबाह्या शरीर संबंध कोणाशी ठेवलेले असतील, तर तोही गुन्हाच असून त्यासाठी पत्नीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या विवाहित महिलेने तिच्या प्रियकराला मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. ही याचिका गुरुवारी सुनावणीस आली असताना न्यायालयाने पत्नीवर कठोर ताशेरे ओढले आहेत.
दोन अपत्यांची आई असलेल्या एका विवाहित महिलेचे एका अन्य पुरुषाशी अनैतिक शारीरिक संबंध होते. या पुरुषाने आपल्याला लग्नाचे वचन देऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा पत्नीचा आरोप होता. या प्रकरणात तिने आपल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार सादर केली होती. उच्च न्यायालयाने प्रियकराला जामीन संमत केला होता. मात्र, महिलेने आपल्या प्रियकराचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने महत्वाच्या टिप्पण्या केल्या आहेत.
पत्नीचा युक्तिवाद
आपल्याला आपल्या पतीला सोडून प्रियकराशी लग्न करायचे होते. प्रियकराने आपल्याला लग्नाचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाच्या आधारावर त्याने आपल्याशी शरीर संबंध ठेवले. तो आपल्याला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावत होता आणि तेथे आपल्याशी शरीरसंबंध करीत होता. पण नंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे. म्हणून प्रियकराला उच्च न्यायालयाने संमत केलेला जामीन रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद या पत्नीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. पण तो मानला गेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
आपण एक विवाहित महिला आणि माता आहात. आपण विवाहबाह्या शरीर संबंध ठेवीत आहोत, याची आपल्याला पूर्ण जाणीव होती. अशा स्थितीत फसवणुकीचा आरोप केला जाऊ शकत नाही. आपण त्याच्या बोलावण्यावरून हॉटेल्समध्ये जात होतात. याचाच अर्थ आपण स्वच्छेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, हे स्पष्ट होते. अशा स्थितीत हा केवळ त्या पुरुषाचा गुन्हा नाही, तर आपणही गुन्हा केलेला आहे. या गुन्ह्यासाठी आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते, अशी स्पष्टोक्ती या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
2016 पासून संबंध
या महिलेचे तिच्या प्रियकराशी संबंध 2016 पासून आहेत, असे पुरावे सादर करण्यात आले होते. एक प्रौढ महिला विवाहाच्या आश्वासनावर विवाहबाह्या संबंध ठेवते, हे पटण्यासारखे नाही. या संबंधांमध्ये तिचीही चूक असून तिनेही गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत ती प्रियकरावर फसवणुकीचा आरोप करु शकत नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाकडून काढण्यात आला आहे.









