कराड :
बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांची लाच मागून त्यातील पाच लाख स्वीकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला सोमवारी अटक झाल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान २० रोजी बदली झालेल्या तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या सहभागाने ही लाच घेतली गेल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने पालिकेचा प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर आला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गुन्हा दाखल असलेला खासगी इसम अजिंक्य अनिल देवला ताब्यात घेतले तर मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक राजेश बाघमारे यांनी दिली.
लाच प्रकरणाने कराड नगरपरिषदेच्या कारभाराला गालबोट लावले असून नागरिकांच्यातुनही तात्कालीन मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमबार पेठेतील बांधकाम परवान्यासाठी तांत्रिक मुद्यांच्या त्रुटी काढून वारंवार तक्रारदाराला त्रास देण्याचा उद्योग सुरू होता. अखेर परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेवर तडजोड करणाऱ्या कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकाऱ्यासह चौघांच्या लाचखोर कारनाम्याचा पर्दाफाश झाला.
बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी १० लाखांची लाच मागून यातील ५ लाखांची लाच घेणारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले. कारवाईत पालिकेचे बदली झालेले मुख्याधिकारी खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार यांच्यासह एका खासगी इसमाचा सहभाग आढळून आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी याप्रकरणाच्या मुळाशी जात खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच प्रचंड खळबळ उडाली. खंदारे यांच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठली. दरम्यान, याप्रकरणात अखेर बुधवारी देव हा पोलिसांच्या ताब्यात सापडल्याचे पोलीस अधिक्षक वाघमारे यांनी सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. शिवाय मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
- देव कोणा कोणाची नावे घेतो?
लाचप्रकरणात अजिंक्य देव याला ताब्यात घेतल्यानंतर आता तो यात आणखी कोणा कोणाची नावे घेतो निव्वळ या शक्यतेने अनेकांची झोप उडाल्याची चर्चा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून लाचप्रकरणात कायमच खासगी इसमांचा वापर केला जातो. हे खासगी इसम यापुर्वी कोण कोणत्या अधिकाऱ्यांसाठी काम करत होते हे उघड होण्याची शक्यता आहे.








