रत्नागिरी :
चौसष्ट कलागुणांचा अधिपती, शक्ती बुद्धीचा दाता, विद्येचा अधिपती, विघ्नहर्ता, विनाशक अशी ख्याती असलेला सर्वांचा लाडका गणराज अवघ्या काही तासांच्या प्रतीक्षेनंतर घरोघरी विराजमान होणार आहेत. २७ऑगस्टला भक्तगणांच्या भेटीस येणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आणि लगबग बाजारात तसेच प्रत्येक घराघरात दिसून येत आहे. गणरायाचे स्वागत तर जल्लोषपूर्ण वातावरणात होणारच. जिल्हाभरातील शेकडो मूर्तीकार बाप्पाला आकारण्यात आणि साकारण्यात मग्न झाले आहेत.
कलाकार तोच असतो जो आपल्या अंगी असणारी कला परिपूर्ण पद्धतीने जोपासत असतो.. आपल्या अंगी असणारे कलागुण जोपासून त्याचा प्रचार प्रसार करणे यातच कलाकारांची कलाकुसर दिसून येते.
३ महिने कारखान्यात त्या गणेशासोबत असणारं एक नातं एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातं. माती मळण्यापासून झालेली सुरुवात अगदी रंगकाम तसेच बाप्पा परिपूर्ण घडत असताना त्याला घडवणारे हे हात अविरत नजरेसमोर राहतात. तीन चार महिने त्या कारखान्यात गणरायासोबत घालवलेले क्षण अगदी गणेशचतुर्थीच्या दिवशी कारखाना रिकामा होईपर्यंत मनात रूंजी घालतात आणि डोळ्यात अश्रू तरळतात.
गणरायाची जेव्हा घरात पूजा केली जाते तेव्हा त्यात देवत्व निर्माण होतं. पण मूर्तीकार त्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये देवत्व येण्यासाठी ३ महिने जीव ओतून काम करत असतो.
बाप्पाची मूर्ती घडवताना हे हात थकले असे आजपर्यंत जाणवलंच नाही. बाप्पाची मूर्ती घडवणारे हे मूर्तीकार कधी थकले असे झाले नाही. नित्यनेमाने कारखान्यात बाप्पाची सेवा करताना येणारे अनुभव वर्षभर डोळ्यासमोर राहतात.
खरंतर कारखान्यात काम करणारे सर्वच कलाकार खऱ्या अर्थाने नशीबवान आहेत असं नेहमीच मनाला वाटतं. कारण नोकरीसाठी जाणारी मुलं नित्यनेमाने आपलं काम संपवून कार्यशाळेत गणरायाला घडवण्यासाठी येत असतात. खरंतर आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नोकरीला जाणारी मुलं गणरायाच्या सेवेसाठी आतुर झालेली असतात. शाळकरी मुलेदेखील अभ्यासासोबत बाप्पाची मूर्ती घडवताना चित्रशाळेत तल्लीन झालेली असतात. खरंतर हे स्वर्गसुख प्रत्येक कलाकाराला एक सुखाचा श्वास अन अनुभव देऊन जात असते.
वाजणारी बाप्पाची गाणी ऐकत मूर्ती घडवणं यासारखे सुख कुठेही नाही. आपल्या हस्तकलेतून घडणारा बाप्पा अन कलाकाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद यासारखं सुख जगात कुठे नाही.
आज आणि उद्या अनेक मूर्तीशाळांमधून शेकडो बाप्पाच्या मूर्ती घरोघरी जाऊन आपल्या जागी विराजमान होणार आहेत.








