वार्ताहर /पणजी
सांतिनेज-पणजी येथून आल्तिनोला जाताना डावीकडे उंचवटय़ावर सांतिनेजकरांचे श्रद्धास्थान असलेले सुंदर असे वाटारेश्वराचे मंदिर आहे. श्री वाटारेश्वर हा सांतिनेजकरांचा आणि पर्यायाने पणजीवासियांचा रक्षणकर्ता. हे देवस्थान मुळी जागृत असल्याने भक्त भाविकांची वाटारेश्वरावर अपार श्रद्धा असून आज मंगळवारी सकाळी 11 वाजून 3 मी. च्या शूभमूहुर्तावर श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना तर 11 वाजून 40 मी. च्या शूभमुहूर्तावर शिखर कलश प्रतिष्ठापना होणार आहे.
त्या ठिकाणी आठ दशकांपूर्वी वाटारेश्वराची छोटीसी मूर्ती या मूर्तीची पूजा प्रथम त्याकाळी मर्तो कवळेकर हे अनेक भाविकांकडून किरकोळ पैसे घेऊन सत्यनारायणाची पूजा घालत असत. ज्या भाविकांनी पुजेसाठी पैसे दिले होते त्याला प्रसादाचा द्रोण ते न विसरता त्या त्या भक्तगणांना नेऊन देत असे. नित्यनियमाने दरवर्षी ही पूजा ते घालत होते. नंतर 35 वर्षांपूर्वी तिथे छोटेसे मंदिर त्या वाडय़ावरील लोकांनी बांधले. जुन्या लोकांना श्री. वाटारेश्वराच्या कृपेचे अनेक अनुभव आलेत. रात्री चुकल्या, माकलेल्यांना, अडचणीत सापडलेल्यांना सुखरूप घरी त्याने पोचवल्याची उदाहरणे आहे. या देवस्थानचे अध्यक्ष तथा समाज कार्यकर्ते मंगलदास नाईक यांच्या कुटुंबातच खुद्द वाटारेश्वराच्या चमत्काराचा अनुभव आहे. त्यामुळे नाईक म्हणतात ही दंतकथा नव्हे प्रत्यक्षातील अनुभव आहेत.
इथल्या भक्तांचा रक्षक बनून भक्तांना पावणाऱया श्री. वाटारेश्वराचे मंदिर व्हावे या हेतूने काही मंडळींनी पुढाकार घेतला आणि हा हा म्हणता मंदतीचा ओघ सुरू झाला. कोरोना महामारीच्या काळात मंदिराचे काम पूर्ण होऊनसुद्धा मुर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण उत्सव करता आला नव्हता मात्र आज सर्व काही सुरळीत होऊन हा उत्सव पार पडत आहे. तसेच दरवर्षी दहावी-बारावी व उच्च शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर श्री वाटारेश्वर देवस्थानात खास सत्य नारायण पूजा बांधत आहेत. गेली कित्येक वर्षा ही परंपरा विद्यार्थी वर्गाने चालू ठेवली आहे, असे कोषाध्यक्ष महेश कांदोळकर यांनी सांगितले.
रविवारपासून भरगच्च धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे परिसर दुमदुमून गेला आहे.









