ब्रसेल्समध्ये राहुल गांधींचे वक्तव्य : इंडिया आघाडीला घाबरले मोदी
वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. भारतात सध्या महात्मां गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारसरणींदरम्यान लढाई सुरू आहे. देशाच्या लोकशाही अन् संस्थांवर हल्ला झाला असून हिंसा-भेदभाव वाढला आहे. अल्पसंख्याक, दलित, आदिवासींना लक्ष्य केले जात असल्याचा दावा राहुल गांधी ब्रसेल्सच्या प्रेस क्लबमध्ये बोलताना केला आहे.
इंडिया आघाडीमुळे केंद्र सरकार घाबरले आहे. आम्ही भारताचा आवाज आहोत. आमच्या आघाडीला घाबरून पंतप्रधान मोदी आता देशाचे नाव बदलू पाहत आहोत. अदानी समुहाविषयीच्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी हा पूर्ण मुद्दा समोर आणला गेल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
भारताचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक लोकांना पुन्हा दारिद्र्यात लोटण्यात आले आहे. भारतात मागील 40 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी आहे. केंद्र सरकारने जी-20 साठी मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण दिले नाही. यातून सरकार देशाच्या 60 टक्के जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांना महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट होते. सरकारची मानसिकता देखील यातून निदर्शनास येत असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.
जी-20 चे अध्यक्षत्व मिळणे देशासाठी चांगली बाब आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आमच्याशिवाय अन्य कुणाचेच याच्याशी देणेघेणे नाही. आम्ही रशिया-युक्रेन युद्धाप्रकरणी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन करतो. रशियाशी आमचे चांगले संबंध आहेत. याप्रकरणी सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोधी पक्षांचाही पाठिंबा असल्याचे राहुल म्हणाले.
भारत एक विशाल देश असून अनेक देशांसोबत संबंध अन् भागीदारी आहे. कुठल्याही देशासोबत संबंध राखण्याचा भारताला हक्क असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी ब्रसेल्समध्ये युरोपीय महासंघाच्या खासदारांची भेट घेतली आहे.









