एकावेळी 10 नोटा बदलता येतील : एसबीआयची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. तसेच कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एकावेळी 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम बदलून मिळेल, असे स्पष्टीकरण एसबीआय या भारतातील सर्वात मोठी बँकेने दिले आहे. नोटा बदलण्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 19 मे रोजी 2000 ऊपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. तसेच नोटा बदलण्यासाठी रोख ठेव नियमांचे पालन करण्याची सूचनाही केली आहे. मात्र, नोटा बदलून घेण्यासाठी आधारकार्ड किंवा तत्सम ओळखपत्र आवश्यक असेल आणि एक फॉर्मही भरावा लागेल, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत आपल्या सर्व शाखांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
नोट बदलण्यासाठी आरबीआयने बँकांना रोख ठेव नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. मंगळवार, 23 मे पासून बँकांमध्ये 2,000 ऊपयांच्या नोटा बदलणे आणि जमा करणे सुरू होईल. त्यासाठी बँकांनी तयारी केली आहे. त्याचबरोबर 2016 प्रमाणे यंदाही नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकांबाहेर गर्दी होणार नाही, असे मानले जात आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनंतर बँकांकडून नोटा बदलण्यासंबंधी परिपत्रक जारी केले जात आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने असा कोणताही फॉर्म जारी केलेला नाही. तसेच 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र द्यावे लागणार नाही. तथापि, सोशल मीडियावर असे प्रकार खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की लोकांना 2000 ऊपयांची नोट बदलण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल. दोन हजार ऊपयांच्या नोटा खूप कमी लोकांकडे असल्याचे बँकांचे म्हणणे आहे.
2000 ची नोट कशी बदलावी?
नोटा बदलण्यासाठी कोणीही आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे. बँकेमध्ये जाऊन सहज नोटा बदलता येतील. तसेच त्याच बँकेत खाते असल्यास स्वत:च्या खात्यात पैसे जमा करता येतील. 20 हजारांपर्यंत कोणतीही स्लिप किंवा फॉर्म भरावा लागणार नाही. कोणताही आयडी दाखवायचा नाही. केवायसी नियमांनुसार नोटा सहजपणे बदलल्या जातील. आरबीआयने एका दिवसात 2000 ऊपयांच्या 10 नोटा बदलण्याची परवानगी दिली आहे. बँक खात्यात पैसे जमा करण्याची मर्यादा नाही, परंतु बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल.
नोटा कधीपर्यंत बदलता येतील?
23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून किंवा खात्यात जमा करता येणार आहेत. यानंतरही नोट बदलू शकत नसाल, म्हणजेच 30 सप्टेंबरची मुदत चुकली तर आरबीआय कार्यालयात जाऊन नोट बदलून घ्यावी लागेल. ज्यांचे बँक खाते नाही ते लोकही आपल्या जवळच्या शाखेत जाऊन 20,000 ऊपयांच्या नोटा सहज मिळवू शकतात. 2000 च्या नोटेच्या समतुल्य मूल्याच्या लहान नोटा बदलून परत केल्या जातील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.









