कोल्हापूर / दीपक जाधव :
‘देवगड हापूस’च्या नावाखाली बनावट आंब्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रत्येक आंब्यावर युनिक आयडी कोड असलेला स्टिकर लावण्यात येणार आहे. या स्टिकरमुळे खऱ्या देवगड हापूस आंब्याची ओळख पटणार आहे. यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे ‘ंटॅपर प्रूफ सील युआयडी’ हे स्टिकर लावण्यात येणार आहे.
जगप्रसिद्ध असणारा देवगड हापूस आंबा हा त्याचा दरवळणारा सुगंध, रंग आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला असलेली प्रचंड मागणी आणि मिळणारा चांगला दर याचा गैरफायदा अन्य भागातील, राज्यातील आंबा व्यापारी घेत आहेत. ‘देवगड हापूस’च्या नावाचे बॉक्स घेऊन त्यामध्ये इतर भागातील आंबा भरुन त्याची विक्री करत आहेत. मुळात बाजारात एक हजार पेटी देवगड हापूस आंबा दिसत असेल तर त्यातील शंभर पेटी हा मुळ देवगड आंबा असतो तर इतर नऊशे पेट्या या इतर आंब्याच्या भरलेल्या असतात आणि त्यामुळेच दर पडतो.
पण हे ग्राहकाला हा ‘देवगड हापूस’ आहे, हे ओळखता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते आणि घरी गेल्यावर आंबा खराब निघाला, बेचव असला किंवा वास नसला तर घेणारा ग्राहक हा ‘देवगड हापूस’ला नाव ठेवतो आणि बदनामी होते ती देवगडची. त्यामुळे ग्राहकांच्या मनात, देवगडवाले शेतकरी ग्राहकांची फसवणूक करतात, असा गैरसमज होतो, त्यामुळे नाहक बदनामीचे खापर देवगडमधील बागायतदार शेतकऱ्यांवर फोडले जाते. त्यामुळे बागायतदाराचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण बदनामीही होते म्हणून ‘देवगड हापूस’ची खरी ओळख ग्राहकांना होण्यासाठी संस्थेने जीआय मानांकन घेतले आहे.
याचा परिणाम न झाल्याने संस्थेने देवगड हापूस आंब्याची ग्राहकाला स्वतंत्र ओळख होण्यासाठी युआय कोड असणारे स्टिकर घेऊन सिस्टीम निर्माण केली. या सिस्टीमवर गेले दोन वर्ष अभ्यास करुन यावर्षी ज्या आंब्यावर स्टिकर असेल तोच ‘खरा देवगड हापूस’ ही टॅगलाईन संस्थेने केली आहे. सध्या देवगड तालुक्यात तीन ते चार हजार आंबा उत्पादक असून यातील काही आंबा उत्पादक थेट व्यापाऱ्यांशी व्यवहार करतात. तर 200 ते 300 शेतकरी हे पुण्यामध्ये स्वत: विक्री करतात. या युआयडी कोडची यावर्षी सुरुवात झाली असून संस्थेचे 750 आंबा उत्पादक शेतकरी सभासद आहेत. सध्या सातशे शेतकरी सभासदांनी नोदणी केली आहे. येत्या काळात ही संख्या हळुहळू वाढत जाणार आहे.
- हे स्टिकर काम कसे करते
आपण घेतलेला आंबा हा खरा देवगड हापूस आहे की नाही, हे ओळखण्यासाठी
या स्टिकरवर छोट्या अक्षरात एक व्हॉट्सअॅप नंबर असून त्या नंबरवर आंब्यावरील स्टिकरचा फोटो काढून टाकल्यानंतर ग्राहकाला एक मेसेज येतो. दोन भागामध्ये असलेल्या स्टिकर वरील काळा भागाचा स्टिकर आहे तो काढून त्याच्या पाठीमागे असणारा दोन अंकी कोड ग्राहकाने परत त्या व्हाट्सअप नंबर ला पाठवल्यास ग्राहकाला त्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचे नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सर्व मेसेज द्वारे समजते. व हा ओरीजिनल देवगड हापूस अंबा आहे की नाही याची खात्री पटणार असून ग्राहक आणि उत्पादक याच्यातील विश्वासार्हता वाढणार असून देवगड हापूस च्या बोगस विक्रीला आळा बसणार आहे.याच बरोबर ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.
- युआयडी कोड स्टिकर असणाराच आंबा खरेदी करा
ज्या आंब्यावर युआयडी स्टिकर असेल तोच खरा देवगड हापूस आंबा असेल ‘जागो ग्राहक जागो’ या नुसार ग्राहकांनी युआयडी कोड स्टिकर असणाराच आंबा ग्राहकांनी खरेदी करुन आपली फसवणूक टाळावी.
– संतोष पाटकर व्यवस्थापक, देवगड तालुका आंबा उत्पादक सह.संस्था देवगड.








