कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेची सांगता : अभिनेत्री वंदना गुप्ते यांची उपस्थिती : सलग 13 व्या वर्षी स्पर्धा उत्साहात
बेळगाव : झोपडपट्टीत राहणाऱ्या दांपत्याचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संघर्ष आणि त्यातच मूल होत नसल्याने समाजाकडून मारले जाणारे टोमणे स्वीकारत एकमेकांच्या सुखासाठी जगणाऱ्या कुटुंबाचे पूर्ण होणारे स्वप्न दाखविणारी ‘लॉटरी’ ही एकांकिका कॅपिटल वन आयोजित मराठी एकांकिका स्पर्धा-2025 ची विजेती ठरली. मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते लॉटरी एकांकिकेच्या सर्व टीमला चषक देण्यात आला. बेळगावमध्ये सलग तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या कॅपिटल वनच्या एकांकिका स्पर्धांबद्दल वंदना गुप्ते यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसाद पंडित, संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे, व्हाईस चेअरमन शाम सुतार उपस्थित होते. वंदना गुप्ते यांनी मधुकर तोरडमल लिखित ‘झुंज’ या नाटकातील संवाद सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या.
याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजी अतिवाडकर, शरद पाटील, नंदा कांबळे, सांस्कृतिक दालनाचे सुभाष सुंठणकर, संस्थेचे कर्मचारी, पिग्मी संकलक व रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून कोल्हापूरचे रवीदर्शन कुलकर्णी, सांगलीचे यशोधन गडकरी, कुडाळचे केदार सामंत उपस्थित होते. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. रविवारी दुपारच्या सत्रात मुंबई येथील संघाने ‘ओल्ड मंक’ ही एकांकिका सादर केली. मुलगी बापाच्या परवानगीने दारू पित असते, मुलगा सिगारेट ओढत असतो. त्यांच्या या वागण्यावर आई आक्षेप घेते आणि त्या मुलांना समजून घेण्यासाठी बाप आईला मदत करतो. त्यामुळे मुले आपोआपच व्यसने सोडतात. इचलकरंजी येथील निष्पाप कलानिकेतन यांनी ‘असाही एक कलावंत’ ही एकांकिका सादर केली. एक ज्येष्ठ कथालेखक रहस्यमय कथांचे लेखन करत असतो. त्याच्याकडे एक नवोदित लेखक काम शिकण्यासाठी येतो. यावेळी त्याला अनुभवांतून लेखन कर, असा सल्ला ज्येष्ठ लेखक देतो. सरतेशेवटी ज्येष्ठ लेखकाचाच खून होतो, अशी ही एकांकिका सादर करण्यात आली. आशयघन एकांकिकांमुळे रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
एकांकिका स्पर्धेचा निकाल
प्रथम- ‘लॉटरी’ (फोर्थ वॉल थिएटर्स, इचलकरंजी), द्वितीय- ‘ऑलमोस्ट डेड’ (गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर), तृतीय- ‘चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध’ (रंगयात्रा नाट्यासंस्था, इचलकरंजी), उत्तेजनार्थ- ‘वर्दी’ (स्पॉट लाईट, कोल्हापूर) व ‘व्हीसीआर’ (वरेरकर नाट्या संघ, बेळगाव), उत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल शिंदे (लॉटरी), उत्तेजनार्थ- प्रमोद पुजारी (ऑलमोस्ट डेड). उत्कृष्ट अभिनेता- गंधार जोग (कलम 375), उत्तेजनार्थ- विकास कांबळे (वर्दी). उत्कृष्ट अभिनेत्री- मानसी कुलकर्णी (लॉटरी), उत्तेजनार्थ- मिलन डिसोझा (चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध). उत्कृष्ट प्रकाशयोजना- अर्जुन पिसाळ, पार्श्वसंगीत- रमा घोलकर, उत्कृष्ट वेशभूषा- अजय होंडेकर, उत्कृष्ट नेपथ्य- ओमकार पाटील.









