इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील एका बँकेच्या कॅश डिपोजिट मशीनमध्ये एका व्यक्तीने बनावट नोटा भरल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. या प्रकरणातील संशयीताला अटक करण्यापूर्वी बुधवारी दुपारी शहरातील आणखीन एका बँकेच्या कँश डिपोजिट मशीनमध्ये बनावट नोटा भरल्याची घटना समोर आली. त्यामुळे शहरातील बँकीग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणाची नोंद पोलिसात झाली आहे.
शहरातील स्टेशन रोडवरील डेक्कन चौक परिसरातील प्रशांत मारुती पाटील याने शहरामधील धान्य ओळतील फेडरल बँकेच्या एटीएम मशीन कम सीडीएम मशीनमध्ये १०० रुपयांच्या १७ नोटा बनावट डिपॉझिट करून, बनावट नोटा चलनात आणल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले होते. या विषयी गावभाग पोलिसात त्याच्या विरोधी गुन्हा नोंद झाला आहे. त्याला अटक करण्यापूर्वी बुधवारी दुपारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखा कँश डिपोजिट मशीनमध्ये एका व्यक्तीने १०० रुपयांच्या ६४ नोटांच्यामध्ये बनावट ११ नोटा घालून भरल्याचे दुसरे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दिनेश तानाजी लोहार (रा. लिंबु चौक, इचलकरंजी) याच्या विरोधी गुन्हा नोंद झाला आहे.