कोल्हापूर प्रतिनिधी
इचलकरंजीवासियांना शुद्ध व मुबलक पाणी देण्याचा शब्द दिला आहे, तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. तसेच मतदार संघातील दुर्गम वाड्यावस्त्याही मुख्य प्रवाहासोबत जोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले.
तरुण भारत संवाद कार्यालयाला खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘तरुण भारत संवाद’चे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ‘तरुण भारत संवाद’चे निवासी संपादक सुधाकर काशिद उपस्थित होते.
खासदार माने म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत वातावरण वेगळे होते. शिवसेना विभागल्यानंतर यंदा प्रथमच निवडणुकांना सामोरे गेलो. त्यामुळे मतदारांचा अंदाज लागत नव्हता. अशा या आव्हानात्मक परिस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांनी विश्वास दाखवत विजयी केले. तसेच महायुतीच्या नेत्यांचीही साथ मोलाची ठरली. कठीण परिस्थितीत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आता जबाबदारी वाढली आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी संपर्क, विकासकामांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे.
इंचलकरजीचा पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला आहे. या अहवालाची माहिती घेवून पुढील काळात इंचलकरंजीचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवून शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच मतदार संघातील अनेक वाड्यावस्त्या मुलभूत सुविधांपासुन वंचित आहेत. तेथील समस्या फार गंभीर आहेत. मात्र येथे विकासकामे करताना वनविभागाच्या मर्यादा येत आहेत. तरीही यामधून पर्याय शोधत वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनाही मुलभूत सुविधा पुरवत त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, शहाजी भोसले, झाकीर हुसेन भालदार, अभिजीत घोरपडे, मयूर भोसले, विकासराव माने, राकेश खोंद्रे, उपस्थित होते.