इराण्णा सिंहासने/ इचलकरंजी
कबड्डी , कुस्ती आणि खो-खोसह विविध खेळांमध्ये ठसा उमटवणाऱ्या इचलकरंजी शहराने आंतरराष्ट्रीय खो-खो विश्वचषकातही दबदबा सिद्ध केला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक प्रो स्पर्धेत इचलकरंजीच्या खेळाडूंनी खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळे इचलकरंजीच्या खेळाडूंनी कौशल्याचा ठसा उमटवत आंतरराष्ट्रीय खो-खोमध्ये दबदबा निर्माण केला आहे.
भारतीय महिला खो-खो संघात इचलकरंजीच्या वैष्णवी पोवारने स्थान मिळवून शहराचा सन्मान वाढवला आहे. मूळचे इचलकरंजीचे पण सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले ओजस कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी प्रशिक्षक हेमंत भांडवले, साहिल कित्तुरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवली आहे. हेमंत यांना दक्षिण कोरिया संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे तर अमेरिकेच्या पुरुष संघासाठी इलेव्हन संघाचे माजी खेळाडू साहिल शिवदास कित्तुरे हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत.
इचलकरंजीसाठी अभिमानासाठी बाब
आयपीएल आणि प्रो कबड्डी स्पर्धांच्या यशानंतर खो-खोच्या जागतिक प्रचारासाठी या विश्वचषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेने भारतीय पारंपरिक खेळांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. इचलकरंजीतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याने भारताला जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करताना शहराचा गौरव वाढवला आहे. इचलकरंजीत खेळाडूंना दर्जेदार सुविधा, कुशल प्रशिक्षक आणि संघटनांचे सहकार्य लाभल्यामुळे खो-खो खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. अल्टिमेट खो-खोसह विविध राष्ट्रीय स्पर्धांतील यशानंतर या खेळाचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने सुरु झाला आहे. या विश्वचषकाने नवोदीत खेळाडूंना प्रेरणा देऊन इचलकरंजीच्या खो-खो परंपरेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. या खेळाडूंचा यशस्वी प्रवास भविष्यातही इतरांना प्रेरित करत राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अथक परिश्रम, कठोर मेहनत
इचलकरंजीला खो-खोची पंढरी म्हणून गौरविले जाते. त्यामागे येथील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमांची महत्त्वाची भूमिका आहे. जयहिंद मंडळ, इलेव्हन संघ, डायनॅमिक संघ, छत्रपती संघ, सरस्वती संघ, बालभारत संघ आणि सीआरएसएसयू तसेच राजमाता जिजाऊ महिला संघ यासारख्या संघांनी खो-खोच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. येथील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
इचलकरंजी खो-खोची पंढरी
महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून लौकिक असलेल्या इचलकरंजी शहराला खो-खो खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय स्तरावर सातत्याने या शहराने खो-खो खेळामध्ये आपले लौकिक कायम ठेवले आहे. गेल्यावर्षी झालेल्या प्रो खो-खोमध्ये इचलकरंजी शहरातील तब्बल 27 खेळाडूंचा समावेश होता. या खेळाच्या माध्यमातून अनेक तरुण शासकीय नोकरीमध्ये आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये ही इचलकरंजी शहराने आपले अस्तित्व वेगवेगळ्या माध्यमातून कायम ठेवले आहे.









