Ichalkaranji Crime News : लहान मुलाला चापटी मारण्यावरुन दोन कुटुंबात मारामारी झाली.यात तरुण सेंट्रिग कामगाराच्या छातीवर हाताच्या ठोशाचा जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.सद्दाम सत्तार शेख (रा. श्री साई मंदीरनजीक,स्वामी मळा,इचलकरंजी)असे मृताचे नाव आहे.ही घटना बुधवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास शहरातील स्वामी मळ्यामधील श्री साई मंदिरालगत घडली. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा शब्बीर गवंडी (रा.स्वामी मळा,इचलकरंजी) सह दोन महिलांना ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सद्दाम शेख हा सेंटिंग कामगार आहे.तो कुटुंबीयांसह स्वामी मळ्यातील श्री साई मंदिरानजीक राहत आहे.याच परिसरात संशयित शब्बीर गवंडी कुटुंबाबरोबर राहतो. हे दोघेही चांगले मित्र असल्याने घरी येणे जाणे आहे.बुधवारी दुपारी संशयित गवंडी यांचा लहान भाचा गल्लीत खेळत होता.त्याला मृत सद्दामने चापटी मारली. याचा जाब विचारण्यासाठी गवंडी कुटुंबीयांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.यावेळी शेख आणि गवंडी या दोन कुटुंबात वादावादी होऊन मारामारी झाली.यात संशयित गवंडीने शेख यांच्या छातीवर हाताचा एक जोरदार ठोसा मारला. तो जबरी बसल्याने शेख जागेवर बेशुद्ध पडले.त्यांच्या नातेवाईकांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू ताशिलदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. दरम्यान, ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या मृत शेख यांच्या नातेवाईकांच्यात आणि संशयित गवंडी कुटुंबात चक्क पोलीस ठाण्याच्या परिसरात चांगलीच हातघाई झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला.मारामारीत सद्दाम शेख यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संशयित शब्बीर गवंडीसह दोन महिलांना चौकशीसाठी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.









