नगरपालिका निवडणुका रद्दनंतर राजकीय गोटात उत्साह; महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षणबाबत उत्सुकता
विजय चव्हाण इचलकरंजी
येथील नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्याने सुरु असलेला नगरपालिका निवडणुक कार्यक्रम रद्द झाल्याचा आदेश राज्य निवडणुक आयोगाने पाठवला आहे. लवकरच महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार असून त्याबाबत कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे सहा महिन्यांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांच्या आशेला धुमारे फुटले असून यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे.
अधिक वाचा- बालेकिल्ल्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधण्याचे आव्हान
राज्य शासनाने 29 जून रोजी एका आदेशाने इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर केले. जिह्यातील आठ नगरपालिकांबरोबर इचलकरंजी पालिकेचा सुरु असलेला निवडणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. लवकरच नूतन महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु केली आहे.
हेही- कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीला मुदत वाढ
सध्या इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर व आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे भाजपची धुरा आहे. राज्यातील बदललेली सत्तासमीकरणे पथ्यावर पाडून घेत महापालिकेवर सत्तास्थापनेसाठी या दोघांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच ताराराणी व राजर्षी शाहू आघाडी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले होते. पण आता राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर या आघाडीसमोरही अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पण आतापर्यंत अगामी नगरपालिका अथवा महानगरपालिका निवडणुकीसाठी पडद्यामागे सुरु असलेल्या हालचाली यापुढे थेट जनतेसमोर येण्याची शक्यता आहे
नगरपालिकेचे 129 वर्षानंतर महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिला महापौर, उपमहापौर व नगरसेवक होण्याचा मान मिळवण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ होणार आहे. किंबहुना पहिल्या महानगरपालिकेवर सत्तास्थापनेसाठी सर्व पक्ष व आघाडय़ांमध्ये चढाओढ लागणार आहे. त्यामुळे अगामी काळात शहरातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडून सत्तासंघर्ष विकोपाला जाणार असल्याची झलक काही दिवसांतच सर्वांना पहावयास मिळेल, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
नवीन प्रभागरचनेबाबत सर्वानाच उत्सुकता
इचलकरंजी महानगरपालिकेची प्रभागरचना अन्य महानगरपालिकेसारखीच त्रिसदस्यीय होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणामुळे याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामुळे अगामी महानगरपालिका निवडणुक एकसदस्यीय होईल अशी ठाम अटकळ इच्छुकांनी बांधली आहे, तर काही जण त्रिसदस्यीय प्रभागरचना होणार असे मत व्यक्त करत आहेत. पण दोन्हीही परिस्थितीत नेमकी कशी व्युहरचना करायची याचे डावपेच आतापासूनच आखले जात आहेत.