कमीत कमी वेळेत लाकूड ओढणारा बैल ही शर्यत जिंकतो
By : संजय खूळ
इचलकरंजी : येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत रविवारी झालेल्या मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलाने 32.5 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकविला.
दरम्यान, सोमवार 9 रोजी सुट्टा बैल पळविणे शर्यत तर मंगळवार 10 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यागृह चौकात जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.मोठ्या गटात प्रथमेश विनायक गायकवाड (34.7) यांच्या बैलाने द्वितीय तर श्रृतेश सुभाष चौगुले (35.5) यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला.
शासन नियमांचे पालन करुन शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी चल भावा सिटीतचा विजेता पैलवान ऋषिकेश चव्हाण याचीही प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी मुरलीधर कदम, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मैदान पुजनाने शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला.
शर्यती पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. 12 जून रोजी जुनी गावचावडी गावभाग येथे होणार्या पारंपारिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.मैदानात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश दत्तवाडे, मौश्मी आवाडे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, डॉ. विजय माळी, शांताप्पा मगदूम, पापालाल मुजावर, राहुल घाट, शेखर शहा, तानाजी भोसले, शिवाजी काळे, बाबासाहेब रुग्गे, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.
काय आहे स्पर्धेचे वैशिष्ट्य?
इचलकंरजीत कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा होता. बेंदूर सणानिमित्ताने येथे अनेक लोकप्रिय खेळांचे आयोजन केले जाते. त्यामधील एक खेळ म्हणजे लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा खेळ होय. कमीत कमी वेळेत लाकूड ओढणारा बैल ही शर्यत जिंकतो. यामध्ये बैलांचे हौशी स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवतात.
या शर्यतीसाठी जहागीरदारांच्या वेळचे शिसवी लाकूड वापरले जाते. या लाकडाचे वजन 380 ते 400 किलो इतके असते. मध्यंतरी हे वजन कमी झाले म्हणून त्यात शिसे भरून घेतले आहे. सध्या या स्पर्धा कागवाडे मळ्यातील जिम्नॅशियम मैदानावर होऊ लागल्या आहेत. मैदानाचे अंतर लहान असल्याने शर्यतीसाठी 105 ऐवजी 100 मीटर अंतर ठेवण्यात आले. आजही तितक्याच उत्साहाने या स्पर्धा होत आहेत. पंचक्रोशीतील अनेक शर्यतप्रेमी यासाठी हजेरी लावताना दिसतात.








