ग्लोबल पीस इंडेक्स-2022 ः भारताचे स्थान सुधारून 135 व्या क्रमांकावर
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
आइसलँड हा जगातील सर्वात शांतिपूर्ण देश ठरला आहे. आइसलँडनंतर न्यूझीलंड आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो. याबाबतचा खुलासा ग्लोबल पीस इंडेक्स 2022 च्या अहवालामुळे झाला आहे. या निर्देशांकात 163 देश आणि क्षेत्रांना स्थान देण्यात आले आहे. या निर्देशांकात भारताचे स्थान 3 अंकांनी सुधारून 135 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर मागील वर्षी भारत 138 व्या स्थानावर राहिला होता.
ग्लोबल पीस इंडेक्स-2022 मध्ये भारताला शांतीप्रकरणी लो कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे. हा निर्देशांक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सामाजिक सुरक्षा आणि सैन्यीकरणाच्या प्रमाणासह 23 निकषांच्या आधारावर देशांचे मूल्यांकन केल्यावर प्रसिद्ध करण्यात येतो.

युरोप सर्वात शांत क्षेत्र
युरोप सर्वात शांतिपूर्ण क्षेत्र ठरला आहे. तेथे आइसलँड युरोपमध्ये अग्रस्थानी आहे. डेन्मार्क, हंगेरी आणि फिनलंड हे युरोपच्या 10 सर्वात शांतिपूर्ण देशांमध्ये सामील आहेत. तर हिंसेमुळे 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला 1287 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण जागतिक अर्थव्यवस्थेच्या 10.9 टक्के इतके आहे.
अफगाणिस्तान सर्वात धोकादायक
या निर्देशांकत अफगाणिस्तान सर्वात धोकादायक देशाच्या शेणीत पहिल्या स्थानावर आहे. सलग पाचव्या वर्षी अफगाणिस्तान सर्वात धोकादायक देश ठरला आहे. परंतु अलिकडच्या महिन्यांमध्ये युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक शांतता निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली आहे.
युक्रेनला युद्धाचा फटका
पूर्व युरोपीय देशात फेब्रुवारीमध्ये रशियाच्या हल्ल्यापासून शांततेप्रकरणी हा देश 17 स्थानांनी घसरला आहे. सद्यकाळात युक्रेन 153 व्या स्थानावर आहे. रशियालाही मोठे नुकसान झाले आहे. 163 देशांमध्ये रशियाचे स्थान 160 वे आहे. दोन्ही देशांना वार्षिक अहवालात ‘अत्यंत कमी’ मानांकन मिळाले आहे. सर्वात मोठी घसरण झालेल्या 5 देशांमध्ये युक्रेन, गिनी, बुर्किना फासो, रशिया आणि हैती यांचा समावेश आहे. तर ज्या 5 देशांमध्ये सर्वाधिक सुधारणा झाली त्यात लीबिया, इजिप्त, सौदी अरेबिया, फिलिपाईन्स आणि अल्जीरियाचा समावेश आहे.
सर्वात शांतिपूर्ण 10 देश
देश स्थान मागील वर्षी
आइसलँड 01 01
न्यूझीलंड 02 02
आयर्लंड 03 08
डेन्मार्क 04 03
ऑस्ट्रिया 05 06
पोर्तुगाल 06 05
स्लोवानिया 07 04
चेक प्रजासत्ताक 08 07
सिंगापूर 09 08
जपान 10 09
जगातील सर्वात अशांत देश
देश स्थान
अफगाणिस्तान 163
येमेन 162
सीरिया 161
रशिया 160
दक्षिण सूदान 159









