कसोटीवरील धोका टाळण्यासाठी योग्य समतोल राखण्याच्या गरजेवर भर
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसीने क्रिकेट वेळापत्रकावर पुरेसे लक्ष पुरविले नसल्याबद्दल इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने त्यांना फटकारले असून जगभरातील स्थानिक टी-20 लीग्सची लोकप्रियता वाढीस लागल्यामुळे कसोटी क्रिकेटच्या आस्तित्वाला धोका निर्माण झाला असल्याचेही त्याने म्हटले आहे.
अलीकडेच इंग्लंड संघाने पाकला त्यांच्याच भूमीत झालेल्या कसोटीत मालिकेत 3-0 असे एकतर्फी पराभूत केले. आजकाल कसोटी क्रिकेट ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्याबद्दल जसे बोलले जात आहे, टी-20 च्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्याबद्दल त्याला वाईट वाटत आहे. ‘वेळापत्रकाकडे जितके लक्ष पुरवायला हवे, तितके ते पुरविले जात नाही. टी-20 वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळविण्यात आलेली इंग्लंडची तीन सामन्यांची वनडे मालिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशी मालिका आयोजित करण्याला काहीच अर्थ नव्हता,’ असे स्टोक्स बीबीसीवर इयान बोथमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. ‘कसोटी क्रिकेटबद्दल ज्या पद्धतीने बोलले जाते ते मला अजिबात आवडत नाही. नवे फॉरमॅट्स आणि प्रँचायजी स्पर्धा यामुळे चाहत्यांचे लक्ष कसोटीपासून दूर जात आहे. खेळाडूंना कसोटीपेक्षा वेगळय़ा व भरपूर संधी मिळताहेत याची मला जाणीव आहे. पण माझ्यासाठी कसोटी क्रिकेट जास्त महत्त्वाचे आहे,’ असेही स्टोक्सने म्हटले आहे.
कसोटी खेळणाऱया देशांनी इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवत अतिआक्रमक खेळावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. निकालापेक्षा मनोरंजनाला महत्त्व दिल्यास कसोटी क्रिकेट दीर्घकाळापर्यंत लोकप्रिय होईल. निकालाचा विचार मानसिकतेपासून दूर नेल्यास तो चांगला प्रारंभ होईल. प्रत्येक दिवस मनोरंजक होईल, पुढे काय घडणार हे लोकांना कळू न देणे, यावर जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. प्रेक्षकांत रोमांच निर्माण केल्यास तुम्ही चेंडू टाकण्याआधीच जिंकलेला असाल,’ असे म्हणत त्याने आयसीसीला कसोटी क्रिकेट अधिक लोकप्रिय करण्यासाठी वेगळे काहीतरी करण्याचे आवाहन केले आहे. ‘कसोटी क्रिकेट माझे अत्यंत आवडते असून आपण काहीतरी वेगळे करू शकतो, असे मला वाटते,’ असेही तो म्हणाला. जो रूटकडून नेतृत्वाची जबाबदारी घेतल्यापासून स्टोक्सच्या इंग्लंड संघाने 10 पैकी 9 कसोटी जिंकल्या आहेत.
31 वर्षीय अष्टपैलू स्टोक्सला अनेक वेगवेगळे संघ निवडणे आणि अतिक्रिकेटच्या व प्रँचायजींशी केलेल्या कमिटमेंटच्या नावाखाली खेळाडूंना विश्रांती देणे हेही नापसंत आहे. ‘तुम्ही इंग्लंडसाठी खेळताय, असे काहीजण म्हणतात तेवढे पुरेसे ठरावे. पण याव्यतिरिक्तही अनेक घटक आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम दर्जा असावा, असे तुम्हाला वाटते. पण आम्ही त्यासाठी वेगवेगळे संघ निवडतो तर काही खेळाडूंना विश्रांती देतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जावे, याला माझा विरोध आहे,’ असे मतही त्याने व्यक्त केले.
प्रँचायजी क्रिकेट ही संकल्पना चांगली आहे, पण देशी लीग्स व कसोटी यांच्यात योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत इयान बोथमने व्यक्त केले. कसोटीमध्ये खेळाडूंच्या सर्व क्षमतांची खऱया अर्थाने कसोटी होते, त्यामुळे ते जास्त महत्वाचे आहे. पण अलीकडे व्हाईटबॉल क्रिकेटवर जास्त भर दिला जात आहे. तसे न करता समतोल राखला गेल्यास कसोटीचेही पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल, असेही तो म्हणाला.









