वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील तीन गुणांची कपात : षटकांची गती कमी राखल्याबद्दल इंग्लंडवरही कारवाई
वृत्तसंस्था/ ऑकलंड
मायदेशात इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत न्यूझीलंडला मोठा फटका बसला असून त्यांची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. यासोबतच पहिल्या कसोटीत षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयसीसीने न्यूझीलंड व इंग्लंड यांचे तीन गुण कापले आहेत. यामुळे किवी संघाची पाचव्या स्थानी घसरण झाली असून अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या दावेदारीलाही मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ही मालिका न्यूझीलंडसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी आहे. ख्राईस्टचर्च येथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये किवी संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीत षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयसीसीने कारवाई करत दोन्ही संघांना चांगलाच दणका दिला आहे. ख्राईस्टचर्च कसोटीत निर्धारित वेळेत दोन्ही संघ षटके पूर्ण करु शकले नव्हते. यामुळे आयसीसीने दोन्ही संघाच्या मॅच फीमधून 15 टक्के दंड ठोठावला आहे. याशिवाय, दोन्ही संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील प्रत्येकी तीन गुण कापले आहेत. आयसीसीच्या या कारवाईचा न्यूझीलंडला मोठा फटका बसला आहे.
फायनलच्या शर्यतीत न्यूझीलंडची वाटचाल बिकट
इंग्लंडचा संघ यापूर्वीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल रेसमधून बाहेर झाला आहे. पण न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. आयसीसीने तीन गुणांची कपात केल्याने गुणतालिकेत किवीज संघ चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानी घसरला आहे. न्यूझीलंडचे आता इंग्लंडविरुद्ध दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना फायनल गाठण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका व श्रीलंका यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. सध्याची स्थिती पाहता, भारत-ऑस्ट्रेलिया, आफ्रिका-लंका या मालिका सुरु आहेत. या संघाची स्थिती न्यूझीलंडपेक्षा चांगली आहे. यामुळे अंतिम फेरीत केवळ दोनच संघ पोहचू शकतात. अर्थात, आयसीसीच्या या कारवाईमुळे किवीज संघाच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत, हे मात्र नक्की.









