महिला वनडे संघात मानधना, दीप्तीचा समावेश
वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीने सर्वोत्तम पुरुष आणि महिला वनडे संघांची शुक्रवारी घोषणा केली. सर्वोत्तम वनडे महिला संघामध्ये भारताच्या स्मृती मानधना आणि अष्टपैलु दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे. मात्र आयसीसीच्या पुरुषांच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. पुरुषांच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये लंका, पाक आणि अफगाण खेळाडूंचे वर्चस्व राहिले.
आयसीसीच्या 2024 सालातील सर्वोत्तम महिला वनडे संघामध्ये इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा, भारत, ऑस्ट्रेलिया तसेच द.आफ्रिकेच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा, लंका, विंडीजच्या प्रत्येकी एका खेळाडूचा सहभाग आहे. या संघामध्ये असलेल्या द. आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीची फलंदाज वूलव्हर्टने 2024 च्या क्रिकेट हंगामात 12 सामन्यातून 697 धावा जमविल्या असून तिची आयसीसीच्या वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2024 च्या आयसीसी पुरुषांच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी भारतीय संघाने विदेशात केवळ तीन वनडे मालिका खेळल्या होत्या. त्यामध्ये दोन मालिका भारताने गमविल्या. लंकेविरुद्धची मालिका भारताने गमविली होती. तर भारताने तिसरी वनडे मालिका बरोबरीत राखली होती. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने 2024 च्या क्रिकेट हंगामात 13 सामन्यातून 747 धावा जमविल्या. महिलाच्या वनडे क्रिकेटमधील मानधनाची ही सर्वोच्च धाव संख्या आहे. तसेच 2024 च्या आयसीसी महिला वनडे सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या शर्यतीमध्येही स्मृती मानधनाचा समावेश आहे.
भारतामध्ये झालेल्या द. आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात मानधनाने सलग दोन शतके झळकविली. तर तिचे तिसरे शतक थोडक्यात हुकले होते. तिसऱ्या सामन्यात ती 90 धावांवर बाद झाली होती. या मालिकेत स्मृतीने 343 धावा जमवित मालिकावीराचा बहुमान मिळविला. गेल्या ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात मानधनाकडून म्हणावी तशी चांगली फलंदाजी झालेली नाही. पण शेवटच्या सामन्यात तिने शानदार शतक झळकविले. भारतातर्फे स्मृती मानधनाने वनडेत सर्वाधिक शतके 2024 च्या कालावधीत झळकविली आहेत. अष्टपैलु दिप्ती शर्माने 2024 च्या क्रिकेट हंगामात 13 सामन्यात फलंदाजीत 186 धावा आणि गोलंदाजीत 24 गडी बाद केले आहेत.
आयसीसीच्या 2024 सालातील पुरुषांच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळविता आले नाही. या संघामध्ये लंकेचे चार खेळाडू, पाक आणि अफगाणचे प्रत्येकी 3 खेळाडू तर विंडीजच्या एका खेळाडूचा समावेश आहे. पुरुषांच्या सर्वोत्तम वनडे संघाच्या कर्णधारपदी लंकेच्या चरिथ असालेंकाची नियुक्ती करण्यात आली आहे. असालेंकाने 2024 च्या क्रिकेट हंगमात 16 वनडे सामन्यात 50.2 धावांच्या सरासरीने 605 धावा जमविताना 1 शतक आणि 4 अर्धशतके नोंदविली आहेत. गेल्यावर्षीच्या क्रिकेट हंगामात लंकेने विविध संघांबरोबर एकूण 18 वनडे सामने खेळले असून त्यापैकी 12 सामने जिंकले आहेत. पाक संघाने 9 पैकी 7 वनडे सामने जिंकले आहेत. तर अफगाणने 14 पैकी 8 वनडे सामने जिंकले आहेत. 2023 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विंडीजच्या रुदरफोर्डने 9 सामन्यात 425 धावा जमविल्या असून त्याचा या संघामध्ये समावेश आहे. आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे पुरुष संघामध्ये रुदरफोर्ड हा एकमेव बिगर आशियाई खेळाडू आहे.
आयसीसी सर्वोत्तम महिला वनडे संघ-स्मृती मानधना, लॉरा वूलव्हर्ट (कर्णधार), चमारी अट्टापटू, हेली मॅथ्युज, मारीझेनी कॅप, अॅस्ले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, अॅमी जोन्स, दिप्ती शर्मा, सोफी इक्लेस्टोन आणि केटी क्रॉस
आयसीसी पुरुषांचा वनडे संघ: चरीथ असालेंका (कर्णधार), सईम आयुब, रेहमत्तुल्ला गुरबाज, पी. निशांका, कुशल मेंडीस, एस. रुदरफोर्ड, अझमातुल्ला ओमरझाई, हसरंगा, शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ आणि ए. एम. गझनफर









