एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकालाही टाकले मागे
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीने भारतातील दर्शकांचे विक्रम मोडले असून या स्पर्धेच्या टीव्ही रेटिंगने बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा विचार करता आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेने 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाला चक्क 23 टक्क्यांनी मागे टाकले.
या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर एकूण 137 अब्ज मिनिटे आणि जिओ हॉटस्टारवर 110 अब्ज मिनिटे पाहण्यात आले. 9 मार्च रोजी दुबई येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातत झालेल्या फायनलने टीव्हीवर 122 दशलक्ष लाईव्ह दर्शकांची आणि जिओ हॉटस्टारवर 61 दशलक्ष दर्शकांची नोंद केली. क्रिकेटमधील डिजिटल दर्शकसंख्येचा विचार करता हा एक विक्रम आहे.
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील 53 अब्ज मिनिटांच्या वॉचटाईमसह आणि थेट प्रक्षेपण पाहिलेल्या 230 दशलक्ष दर्शकांसह अंतिम सामना हा टीव्ही इतिहासातील (आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामने वगळता) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च रेटेडे एकदिवसीय सामना ठरला आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीने आठ वर्षांनंतर आश्चर्यकारक पुनरागमन केले आणि भारतातील दर्शकांची संख्या, विशेषत: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान जबरदस्त राहिली.









