वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या विभागातील क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील पुरुष विभागातील हा सर्वोत्तम पुरस्कार भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलला जाहीर झाला आहे.
सप्टेंबर महिन्यातील पुरुष विभागात आयसीसीच्या या सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीमध्ये शुभमन गिल, मोहमद सिराज आणि इंग्लंडचा सलामीचा फलंदाज डेविड मलान यांचा समावेश होता पण गिलने सिराज आणि मलान यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत गिलने 80 धावांच्या सरासरीने 480 धावा वनडे क्रिकेटमध्ये जमवल्या. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत गिलने 75.5 धावांच्या सरासरीने 302 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर भारतामध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत गिलने दोन डावात 178 धावा झोडपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्यासामन्यात त्याने 104 धावा तर आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 121 धावा झळकवल्या होत्या. याशिवाय गिलने सप्टेंबर महिन्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये तीन अर्धशतके झळकवली आहेत. आयसीसीच्या पुरुषांच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत 24 वर्षीय गिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 35 सामन्यात 1917 धावा जमवल्या आहेत. त्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला पण डेंग्यूची लागण झाल्याने त्याला पहिल्या दोन सामन्यात खेळता आले नाही. दरम्यान अहमदाबादमध्ये शनिवारी होणाऱ्या पाक विरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









