प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजपशी हातमिळवणी केल्याने निजदश्रेष्ठींवर थेट टीका केलेल्या सी. एम. इब्राहिम यांची निजद प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले नंतर त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली. आता इब्राहिम यांनी निजदचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना शड्डू ठोकला आहे. त्यांनी सोमवारी बेंगळूरमधील हॉटेलमध्ये निजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील काही सदस्यांची बैठक घेतली. यावेळी केरळमधील नेते सी. के. नानू यांची निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना सी. एम. इब्राहिम यांनी, निजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपद बदलाचा निर्णय माझा नाही, हा राष्ट्रीय कौन्सिलचा निर्णय आहे. जयप्रकाश नारायण यांच्या तत्वांवर निजद पक्षाची बांधणी झाली. पक्षाच्या सर्व राज्यांचे अध्यक्ष नेमण्याचा अधिकार सी. के. नानू यांना देण्यात आला आहे. जानेवारीमध्ये हुबळीत मेळावा आयोजिण्यात येईल. त्यावेळी राहुल गांधींना देखील निमंत्रण दिले जाणार आहे. अखिलेश यादव, नितीशकुमार देखील येतील, असे सांगितले.
आपला जन्म पक्षाच्या तत्वांसाठी आहे. वाजपेयी यांनी मंत्रिपदासाठी निमंत्रण दिले तरी मी नाकारले. राज्यपालपदासाठी बोलावल्यानंतरही नकार दिला. मात्र, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मुलांचे हित, दोन जागांसाठी पक्षाच्या तत्वांचा बळी दिला आहे. आम्ही तीन वेळा मुदत दिली. अखेर त्यांना अध्यक्षपदावरून हटवून सी. के. नानू यांच्याकडे अधिकार दिले आहेत, असेही इब्राहिम यांनी सांगितले.









