वृत्तसंस्था/ ढाका
आगामी होणाऱ्या 2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतुन बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे. आता या स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या बांगलादेशच्या 17 जणांच्या संघामध्ये इबादत हुसेनच्या जागी नवोदित तनझिम हसन साकिबचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेश संघाचे नेतृत्व अनुभवी शकीब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे.
या आगामी स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने 10 दिवसापूर्वी आपल्या संघाची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या अफगाणविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना इबादतला स्नायू दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्याला आणखी किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने तो आशिया चषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही असे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. 2020 साली झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या बांगलादेश क्रिकेट संघात तनझिम हसन साकीबचा समावेश होता. 20 वर्षीय शकीब आता या आगामी स्पर्धेत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल.









