प्रतिनिधी/ बेळगाव
मातृभाषेतून शिक्षण घेऊन आयएएस आयपीएस परीक्षा पास होणे शक्य आहे. त्यासाठी आत्मविश्वास, खडतर परिश्रम, सततचे प्रयत्न केल्यास यश निश्चित आहे. कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
येथील कुमारगंधर्व रंगमंदिरामध्ये कौशल्य विकास आणि जीवनोपाय खाते जिल्हा उद्योग विनिमय केंद्र, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, केएएस, स्पर्धा परीक्षा, मोफत प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन करून ते बोलत होते.
आयएएस, आयपीएस या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणे शक्य आहे. यासाठी दृढनिश्चय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी अथक परिश्रम घेण्याची गरज आहे. 18 ते 20 तास अभ्यास करण्याची गरज नाही. दररोज आठ ते दहा तास अभ्यास करणे आवश्यक आहे. मात्र यासाठी विषयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे गरजेचे आहे. इंग्रजी भाषेची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. आपण मातृभाषेतून शिक्षण घेऊन चार वेळा प्रयत्न केल्यानंतर या पदावर पोहोचलो असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
आपण अभियांत्रिकी शिक्षण घेऊन बेंगळूर येथे काही काळ काम केले. या कामाबरोबरच अभ्यास करत आएएस उत्तीर्ण झालो आहोत. उत्तर कर्नाटकातील मुले अत्यंत हुशार असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. राज्यामध्ये दक्षिण कर्नाटकानंतर उत्तर कर्नाटकातीलच अनेकजण या स्पर्धां परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्याच्या उदाहरण पाहिल्यास मार्गदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या नुकताच आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उद्योग विनिमय केंद्राच्या संचालक साधना पोटे, प्रशिक्षणार्थी आयएएस साहित्या एम., गजानन वाली, शुभम शुक्ला, मुकुल जैन, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, आदी उपस्थित होते. तसेच विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.









