संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार : चंदीगडमध्ये उद्घाटन
वृत्तसंस्था/ चंदीगड
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी चंदीगड येथे भारतीय हवाई दल हेरिटेज सेंटरचे उद्घाटन केले. भारतीय वायुसेनेचे हे हेरिटेज सेंटर कलाकृती आणि नमुने यांच्या परस्परसंवादी अर्थाद्वारे भारतीय हवाई दलाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवतानाच तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. हे केंद्र केवळ चंदीगडमधील लोकांसाठीच नाही तर देशवासियांसाठीही मोठे आकर्षण ठरेल, असे ते पुढे म्हणाले.
गेल्यावषी 3 जून 2022 रोजी चंदीगडमध्ये आयएएफ हेरिटेज सेंटरच्या स्थापनेसाठी केंद्रशासित प्रदेश चंदीगड आणि भारतीय हवाई दल यांच्यात एक करार झाला होता. पंजाब सरकार, चंदीगड प्रशासन आणि भारतीय हवाई दल यांनी संकल्पित केलेला एक ड्रीम प्रोजेक्ट होता. 17,000 चौरस फुटांमध्ये पसरलेले हे भारतीय हवाई दलाचे पहिले हेरिटेज केंद्र आहे. 1965 आणि 1971 च्या कारगिल युद्धासह आणि बालाकोट हवाई हल्ल्यासह विविध युद्धांमधील हवाई दलाच्या भूमिकेचे चित्रण भित्तीचित्रे आणि स्मरणचित्रांद्वारे करण्यात आले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हेरिटेज सेंटरची वैशिष्ट्यापूर्णता ट्विट केली आहे. “भारताचे पहिले आयएएफ हेरिटेज सेंटर आज चंदीगड येथे राष्ट्राला समर्पित करण्यात आले. हे केंद्र भारतीय हवाई दलात सेवा केलेल्या सर्वांच्या धैर्य आणि समर्पणाचा दाखला आहे. राष्ट्ररक्षणात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण या माध्यमातून कायमस्वरुपी स्मरणात राहील”, असे ट्विट संरक्षणमंत्र्यांनी केले.
मानवतावादी सहाय्य आणि लढाऊ क्षमतांव्यतिरिक्त आपत्ती निवारणात हवाई दलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका हेरिटेज केंद्र प्रदर्शित करेल. या केंद्रात विविध विंटेज विमानेही ठेवण्यात येणार आहेत. आयएएफ हेरिटेज सेंटर तऊणांना भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रेरित करेल. या अद्भूत उपक्रमामुळे भारतीय हवाई दलाचा समृद्ध वारसा जपण्यास मदत होईल आणि तऊणांना सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असेही राजनाथ सिंग यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले.
आकर्षणात्मक गोष्टींचा समावेश
हेरिटेज केंद्रातील विविध कक्षांमध्ये अनेक आकर्षणे मांडण्यात आली आहेत. यात विमानाचे मॉडेल, एरो इंजिन आणि शस्त्रे, गन्स यांचा समावेश आहे. तसेच फ्लाइंग सिम्युलेटरचाही समावेश असून त्या पर्यटकांना उ•ाणाचा अनुभव देतील. हेरिटेज सेंटरच्या आकर्षणांमध्ये पाच विंटेज विमाने आणि क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. त्याशिवाय भारतीय हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना राष्ट्रसेवेतील त्यांच्या योगदानासाठी समर्पित एक विशेष विभागही आहे. तसेच भारतीय वायुसेनेच्या स्थापनेपासून त्याच्या उत्क्रांतीपर्यंतच्या आधुनिक काळापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेते. हेरिटेज सेंटरमध्ये एक स्मरणिका वितरण केंद्रही आहे.









