इम्रान यांनी शाहबाजना दाखवून दिली जागा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण देशाच्या सरकारशी कुठलीच चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पीएमएल-एन सरकारशी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. शरीफ सरकार हे हातचे बाहुले असून केवळ सैन्याशी चर्चा अन तडजोड करणार असल्याचे इम्रान यांनी स्पष्ट केले आहे. पीटीआय नेते इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानच्या अडियाला तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत. काही खटल्यांप्रकरणी त्यांना शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
पीएमएल-एन सरकारशी बोलण्याचा कुठलाच फायदा नाही, कारण हे सरकार बनावट पद्धतीने निवडणुकीतील मते लुटून स्थापन झाले आहे. शाहबाज शरीफ यांचे सरकार केवळ देखाव्यासाठी आहे, त्याच्याकडे कुठलीच शक्ती नाही. अशास्थितीत खरी शक्ती असलेल्या सैन्याशीच आम्ही बोलणी करू. तुरुंग आणि अडचणींना मी घाबरत नाही आणि माझा निर्धार अद्याप मजबूत असल्याचे इम्रान यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
पाकिस्तानात कायदा-सुव्यवस्था संपुष्टात
माझ्या पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. पीटीआय सदस्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे. पीटीआय नेत्यांसोबत होत असलेला प्रकार पाहता पाकिस्तानात कायदा-सुव्यवस्था राहिली नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप इम्रान यांनी केला आहे. तसेच इम्रान यांनी सरकार किंवा सैन्यासोबत पडद्याआडून चर्चेस नकार दिला. कुणीच माझ्याशी कुठल्याही प्रकारच्या चर्चेसाठी संपर्क साधलेला नाही. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मी घाबरणार नाही आणि स्वत:च्या देशाकरता दृढ राहणार असल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.
असीम यांचा उपहास
इम्रान यांनी पाक सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल करण्याच्या निर्णयाचा उपहास केला. असीम मुनीर यांना फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ केले जावे अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. मुनीर यांनी स्वत:च स्वत:ला पदोन्नती दिली असल्याची टीका त्यांनी केली.









