ममता बॅनर्जींचा भाच्याला झटका : तृणमूल काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून मतभेद
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील सत्तारुढ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक यांच्यात मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अभिषेक बॅनर्जी हे पक्षात महत्त्वाचे पद इच्छित असल्याची चर्चा आहे, परंतु ममता बॅनर्जी यांनी मात्र भाच्यासमोर प्रतीक्षेचाच पर्याय ठेवला आहे. पक्षाचे कार्यकर्ते माझा जन्मदिन साजरा करतात, परंतु माझी जन्मतारीखच निश्चित नाही. माझे वय तर प्रमाणपत्रावर 5 वर्षे अधिक लिहिले आहे. अजून मी 10 वर्षांपर्यंत सक्रीय राहणार असून पक्षाचे नेतृत्व माझ्याकडेच राहिल अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या टिप्पणीनंतर त्यांनी स्वत:च्या भाच्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला रोखण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. प्रत्येक जण माझा जन्मदिन साजरा करतो. परंतु जी जन्मतारीख सांगितली जाते, त्यादिवशी माझा जन्म झाला नव्हता. त्या काळात घरातच मुलं जन्माला यायची. माझे नाव, वय आणि आडनाव देखील मी ठरविलेले नाही. माझ्या पालकांनी केवळ प्रमाणपत्रावर एक तारीख लिहिली होती, त्यालाच आज माझी जन्मतारीख मानले जाते. यात काहीच चुकीचे नाही. जुन्या काळात लोक जन्मवेळ इत्यादींना अधिक महत्त्व देत नव्हते असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
दस्तऐवजांमध्ये ममता बॅनर्जी यांची जन्मतारीख 5 जानेवारी 1955 नमूद आहे. यानुसार त्या 70 वर्षांच्या झाल्या आहेत. परंतु आपले वय 65 वर्षेच असल्याचा दावा ममता बॅनर्जीचा आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व स्वत:कडेच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना मोठा झटका बसणार आहे. अभिषेक आणि ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांमध्ये वाद दिसून येत अताहेत. खासकरून डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात अभिषेक बॅनर्जी यांच्याकडुन राज्य सरकारपासून वेगळ्या समांतर योजना राबविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे. अभिषेक हे ममता दीदींपेक्षा वेगळे एक मॉडेल सादर करू पाहत असल्याचे मानले जात आहे.
मतभेदांची कबुली
ममता बॅनर्जी यांना आणखी 10 वर्षे सक्रीय राहणार असल्याचे म्हटले असलेतरीही अभिषेक बॅनर्जी यांच्याशी मतभेद असल्याचे नाकारले नाही. परिवारात असे घडतच असते. जेव्हा एखादा राजकीय पक्ष वाढतो आणि मोठा होतो, तेव्हा अशाप्रकारचे प्रसंग घडतात. भाजप आणि माकप यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत का? परिवारांमध्येही अंतर्गत मतभेद असतात. हजारो पक्ष कार्यकर्ते आहेत. याचमुळे परस्परांमध्ये काही प्रमाणात मतभेद होणे स्वाभाविक आहे. कामाच्याठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद नसतात का? परंतु याचा अर्थ मनाला वाटेल तसे करावे असा होत नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.









