ब्राझीलच्या अध्यक्षांनी फेटाळला ट्रम्प यांचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केवळ भारताला धमकावत नसून अमेरिकेचा सहकारी देश ब्राझीललाही त्रस्त करत आहेत. याप्रकरणी ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लूला दा सिल्वा यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मी फोन करणार नाही, ट्रम्प यांना फोन करण्याची माझी कुठलीच योजना नाही. ज्या दिवशी अमेरिकेने ब्राझीलवर भरभक्कम आयातशुल्क लादले, तो दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासातील ‘सर्वात खेदजनक’ क्षण आहे. मी ट्रम्प यांना फोन करण्याऐवजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना फोन करेन असे ब्राझीलच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वक्तव्याद्वारे ब्राझीलचे अध्यक्ष मला आयातशुल्कासंबंधी चर्चा करण्यासाठी फोन करू शकतात असे म्हटले हेते.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिका आणि ब्राझीलमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लूला यांनी अमेरिकेकडून आयातशुल्क लादण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासातील ‘सर्वात खेदजनक’ ठरविले आहे. आमचे सरकार ब्रिक्स भागीदारांसमवेत अन्य देशांसोबत विदेशी व्यापार मजबूत करण्यासाठी यापूर्वीच पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ब्राझील हा ब्रिक्सचा सदस्य आहे. यात भारतासह रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका सामील आहे. अलिकडेच ब्रिक्सचा विस्तार झाला असून यात आणखी अनेक देशांना सामील करण्यात आले आहे. ब्राझीलनेच ब्रिक्सचे चलन सादर करण्याची योजना मांडली आहे, याचमुळे ट्रम्प हे ब्राझीलवर संतप्त झाले आहेत.
पंतप्रधान मोदींशी बोलेन
2025 मध्ये आम्ही आमच्या हितांच्या रक्षणासाठी जागतिक व्यापार संघटनेशी चर्चा सुरू करण्यासोबत सर्व संभाव्य उपायांची मदत घेऊ. आयातशुल्कावर चर्चेसाठी मी ट्रम्प यांना फोन करणार नाही, कारण अमेरिकन नेता चर्चा करू इच्छित नाही. परंतु मी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना फोन करेन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करेन. मी पुतीन यांना फोन करणार नाही, कारण ते सध्या दौरा करू शकत नाहीत. परंतु मी अनेक राष्ट्रप्रमुखांना फोन करणार आहे असे वक्तव्य लूला यांनी ब्राझिलिया येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कॉप30 मध्ये ट्रम्प यांना आमंत्रित करू
वाढत्या तणावाच्या स्थितीतही लूला यांनी नोव्हेंबर महिन्यात बेलेम येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषद कॉप30 करता अध्यक्ष ट्रम्प यांना आमंत्रित करणार असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांना कॉप30 मध्ये आमंत्रित करणे आणि हवामानविषयक मुद्द्यावर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी फोन करणर आहे. जर ते या परिषदेत सामील होणार नसतील तर ती त्यांची मर्जी असेल. ब्राझील अमेरिकेसोबत आयातशुल्यावर चर्चा करण्यास तयार आहे, परंतु ही चर्चा समान अटी आणि परस्पर सन्मानाच्या आधारावर व्हायला हवी असे उद्गार लूला यांनी काढले आहेत.









