ज्ञानवापीचे वकील ऍड.हरिशंकर जैन यांचे विधान
प्रतिनिधी /फोंडा
काशी येथील ज्ञानवापी खटल्यासंबंधी आमच्याकडे संशोधनावर आधारीत ठोस पुरावे आहेत. त्याच आधारावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्ञानवापी खटल्याबरोबरच ताजमहाल, कुतुबमिनार तसेच देशभरातील विविध राज्यातून प्राचिन हिंदू मंदिराबाबत दावे पुढे येऊ लागले आहे. गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी मंदिर पुर्ननिर्माणाची घोषणा करुन क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. तसे पुरावे पुढे आल्यास पोर्तुगीज साम्राज्यात व त्यापूर्वीच्या आक्रमकांनी धर्मांतराच्या आधारावर जी मंदिरे उद्ध्वस्त केली ते खटलेही लढण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती ज्ञानवापी खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचे वकील ऍड. हरिशंकर जैन यांनी दिली.
रामनाथी-फोंडा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या जैन यांनी रविवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना हे विधान केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने खरा इतिहास दडपून टाकला होता. आज हिंदू लोक आपल्या प्राचीन धार्मिक अस्मितेबद्दल जागृत होत आहेत. आम्हाला नवीन काही शोधायचे नाही. प्राचीन भारतीय संस्कृती व अस्मितेशी जे जे जोडलेले आहे ते सत्य जगासमोर आणायचे आहे. आम्ही काही नवीन मागत नाही. जे पूर्वापारपासून आमचे होते तेच मागतो. त्यात कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही. येत्या काही काळात आम्ही हा खटला ठोस पुराव्यासह जिंकू व तेथे शिवलिंग असल्याचे सिद्ध करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









