नितीशकुमार यांची भूमिका
पाटणा / वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच आता राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच गंभीर होताना दिसत आहेत. भाजपमध्ये येण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मी मरण स्वीकारेन, पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. नितीशकुमार यांच्या या नव्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनीही खरपूस समाचार घेतला आहे.
नितीशकुमार यांनी सध्याच्या भाजप नेतृत्त्वावर जोरदार टीका केली आहे. भाजप आता जुना भाजप राहिला नाही. भाजपच्या नेत्याने नवा भाजप स्थापन केला आहे. जुन्या नेत्यांना विचाराल तर तेही तेच सांगतील, असे ते म्हणाले. सध्या आमच्यासोबत असलेल्या तेजस्वी यादवना अडकवण्यासाठीही भाजपचे नेते वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यांनी यापूर्वीही असेच म्हटले होते ः भाजप
नितीशकुमार यांनी यापूर्वीही भाजपसोबत येणार नसल्याची भाषा वापरली होती. ‘वेळप्रसंगी आम्ही मातीत मिसळून जाऊ, पण भाजपसोबत जाणार नाही’ या वक्तव्याची आठवण भाजप नेते आणि बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी यांनी करून दिली. यापूर्वी असे वक्तव्य केल्यानंतरही त्यांनी भाजपशी युती केली होती असे सांगत 2024 मध्ये त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील हे सर्वांना माहीत आहे, असे चौधरी पुढे म्हणाले.









