सावर्डे येथील मेळाव्यात आमदार शेखर निकम यांची माहिती
चिपळूण प्रतिनिधी
माझ्या मतदार संघात अनेक प्रश्न खितपत पडले असून ते सोडवायचे असतील तर अजितदादांची आपल्याला गरज आहे. त्यांच्यासोबत गेल्याने विकासाचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. विकासासाठी निधीचा प्रश्न असो अथवा अन्य प्रश्न मात्र ज्या-ज्यावेळी अडचणी आल्या, त्या-त्यावेळी. अजितदादा पवार खंबीरपणे पाठीशी राहिले. म्हणूनच आपण त्यांच्यासोबत गेलो असल्याचे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच सावर्डे येथील आयटीआय सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी स्वार्थासाठी गेलो, असे म्हटले याचा विपर्यास केला गेला. माझा स्वतःचा स्वार्थ काय असणार, मला ईडीची भीती नाही, पदाची व मंत्रिपदाची अपेक्षा नाही. माझा स्वार्थ हाच की माझ्या मतदार संघातील रखडलेल्या कामासाठी निधी मिळावा. महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी उपोषण सुरू होते. निधीची अडचण होती. याचवेळी आपण माझ्या लोकांपेक्षा आमदारकी मला महत्वाची नसल्याने मी राजीनामा देतो, असे सांगताच अजितदादांनी २० कोटी लगेच दिले आणि नदीतील गाळ निघाला. अजितदादांचे योगदान चिपळूणसाठी मोठे आहे.
खरे तर पवार आणि निकम कुटुंबातील स्नेह सर्वांना माहित आहे. तो मी सांगणार नाही. अजितदादांकडे गेल्यानंतर मला काय वेदना होत आहेत, हे मलाच माहित. पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र यावे, अशीच मी देवाजवळ प्रार्थना करतो.
आहे. हे सांगताना आमदार निकम भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले. शरद पवार साहेब हे माझे दैवत आहे व अजितदादाही तेवढेच महत्वाचे आहेत. मागच्यावेळी हाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी आपल्याला चर्चा करायला वेळ मिळाला होता. आपण अनेकांजवळ चर्चा केली होती. मात्र पुन्हा म्हणजे अडीच वर्षांनी अशी वेळ आली. यावेळी मात्र कोणाजवळही चर्चा करायला संधी मिळाली नाही. साऱ्या घडामोडी वेगाने घडल्या होत्या आणि त्याच वेगाने आपण अजितदादांना शब्दही दिला होता,असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.