राहुल गांधी यांची तक्रार, लोकसभाध्यक्षांचा इन्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपल्याला लोकसभेत बोलण्याची संधीच दिली जात नाही, अशी तक्रार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे कामकाज अत्यंत अलोकशाही पद्धतीने चालविले जाते. मी विरोधी पक्षनेता असूनही मला बोलू दिले जात नाही. भारताच्या सध्याच्या नव्या पद्धतीत विरोधी पक्षांना कोणतेही स्थान नाही, असा आरोप त्यांनी केला. मात्र, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो फेटाळला आहे.
राहुल गांधी किंवा अन्य कोणत्याही विरोधी नेत्याला बोलण्यापासून रोखले जात नाही. त्यांना नियमांच्या अनुसार कोणताही विषय मांडण्याची आणि त्यावर बोलण्याची संधी मिळते. मात्र, राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांनी सभागृहाच्या शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी शिस्तीचे पालन केले नाही, तर त्यांना ते करावयास लावण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रतिपादन बिर्ला यांनी केले.
नियम पाळण्याचा आदेश
लोकसभेत मंगळवारी राहुल गांधी यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अध्यक्ष बिर्ला यांनी त्यांना दटावले. नियमाप्रमाणे वागण्याचा आदेश दिला. तुमचे म्हणणे योग्यप्रकारे आणि नियमांच्या अनुसार मांडा, असा सल्ला त्यांनी गांधी यांना दिला. त्यामुळे संतप्त होऊन गांधी यांनी सदनाबाहेर बिर्ला यांच्यावर आगपाखड केली आहे. आमची गळचेपी होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
जेव्हा उभा राहतो तेव्हा…
लोकसभेत मी जेव्हा काही बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा मला रोखण्यात येते. महत्वाचे मुद्देही मांडू दिले जात नाहीत. हे काय चालले आहे मला कळत नाही. मी बोलण्याची अनुमती मागितली तेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांनी पळ काढला. सभागृह चालविण्याची ही पद्धत नाही. सभाध्यक्ष त्यांच्या आसनावरून उठून गेले आणि त्यामुळे माझे बोलणे खुंटले. ही लोकशाही नव्हे. मी कुंभमेळ्यासंबंधी बोलणार होतो. मला बेरोजगारीसंबंधी बोलायचे होते. पण माझ्याकडे लक्षच देण्यात आले नाही, असे अनेक आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केले.
वाद का निर्माण झाला…
गेल्या तीन दिवसांमध्ये लोकसभेत अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा झाली. त्यात वित्त विधेयकावरील चर्चा महत्वाची होती. अन्य सदस्य बोलत असताना राहुल गांधी यांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. सभाध्यक्षांनी त्यांना नंतर संधी दिली जाईल, असे समजावण्याचा प्रयत्न केला. जो विषय चालला आहे, त्या विषयावर बोलण्याची आवश्यकता आहे. तसेच अन्य विषय सभागृहात चर्चेसाठी आणावयाचा असेल, तर त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचे पालन करण्याचे उत्तरदायित्व प्रत्येक सदस्याचे आहे. या सभागृहात पिता, पुत्री, पुत्र, माता, पत्नी आणि पती असे अनेक नात्यांचे सदस्य आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षनेत्याने नियमांचे पालन करावे. अशी माझी अपेक्षा आहे. यांनी नियम पाळल्यास आणि शिस्तीचे पालन केल्यास कोणत्याही प्रश्न निर्माण होणार नाही, असे स्पष्टीकरण बिर्ला यांनी या प्रसंगावरून केले आहे.









