राजापूर :
निवडणुकीपूर्वी राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते. उदय सामंत यांनी रत्नागिरीचे तर राजन साळवींनी राजापूरचे आमदार व्हावे आणि मी खासदार व्हावे, अशी माझी इच्छा होती. मात्र साळवींनी योग्यवेळी निर्णय घेतला नाही, असे सांगतानाच सामंत योग्यवेळी निर्णय घेतात, असे प्रतिपादन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी येथे केले.
माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षांतर केल्यानंतर ते पहिल्यांदाच राजापूरमध्ये आले होते. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामंत बोलत होते. राजन साळवी व आमचे जुने संबंध आहेत. उदय सामंत प्रथमच आमदार झाल्यामुळे राजन साळवींना त्यांचे जिल्हाप्रमुखपद गमवावे लागले. आपण त्यावेळी प्रतिस्पर्धी होतो, शत्रू नव्हतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. त्यामध्ये राजन साळवी यांचा सहभाग होता. पण नंतर काहीतरी बिनसले. भविष्यातील निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला लढवायच्या आहेत, असे सामंत म्हणाले.
- शिवसेना जोमाने काम करेल!
आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे लांजा–राजापूर मतदार संघात शिवसेना आणखी जोमाने काम करेल. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायती, नगर परिषदा, नगर पंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका शिवसेना म्हणून आपण जिंकणार आहोत. राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघातील धरणांची कामे, जलजीवन मिशनची काम पूर्ण करून हा मतदार संघ टॅंकरमुक्त करायचा आहे. राजापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया काही दिवसातच पूर्ण होईल आणि येत्या बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. तालुक्यातील 20 शाळा नूतनीकरणासाठी घेण्यात आल्या असून दुसऱ्या टप्प्यात 40 शाळा नूतनीकरणासाठी घेणार आहोत. स्मार्ट शाळा करण्याकडे आमचा प्रयत्न आहे. महावितरणच्या समस्या सोडवण्यासाठी 420 कोटीचा डीपीआर तयार केला असून मुख्यमंत्री यांनीही त्याला तत्वत: मंजुरी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. तुमच्या सगळ्dयांचा पाठिंबा असेल तर हा प्रकल्प आपण राजापूर तालुक्यात राबवू शकतो, असे सामंत यांनी सांगितले.
- किरण भैय्या तुम्हाला कळस चढवायचाय!
राजन साळवी म्हणाले, राजकारणात आजचा शत्रू उद्या मित्र होतो. एकनाथ शिंदे यांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी साद घातली होती. आपल्याला एकत्रपणे काम करायचा आहे. शिवसेना वाढवायची आहे. मागच्या काळात काय झालं, यापेक्षा भविष्यात काय करायचे, याचा शोध घेतला पाहिजे. यापुढे हातामध्ये हात घालून काम केले पाहिजे. किरण भैय्या तुम्हाला कळस चढवायचा आहे, असे साळवी यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे राजू कुरूप, विलास चाळके, संजय साळवी, प्रकाश कुवळेकर, जगदीश राजापकर, अशफाक हाजू, भरत लाड, शुभांगी डबरे, हर्षदा खानविलकर, दुर्वा तावडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








