सातारा :
कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी व राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कब्बडी पंच सायराबानू शेख यांनी स्वतःची जागा मोफत उपलब्ध करून दिली! कबड्डीसारख्या खेळातून अनेक नामांकित मंडळांनी राज्यास हजारो खेळाडू घडवून देण्याचे कार्य सातारा शहराने केले.
कबड्डी खेळात सातारच्या शेख (नगारजी) परिवाराला कबड्डीची परंपरा दोन पिढ्यांपासूनची आहे. क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या श्री शिवाजी उदय मंडळाचे माध्यमातून अण्णांची मानस कन्या म्हणून सायराबनू शेख मॅडम यांनी ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मुलींच्या व्यतिमत्व विकासावर विशेष फोकस करून, कबड्डी खेळातून घडविण्याचे व त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकविण्याच्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यातून त्यांना राज्य व राष्ट्रीय ठिकाणी नोकऱ्यांची संधी मिळाली. आतापर्यंत ग्रामीण भागातील शेकडो मुलींना खेळासाठी प्रसंगी दत्तक घेऊन पालकांचा विश्वास संपादन केला.
कन्या शाळेतील नोकरीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींना शालेय जीवनात शिस्त लावली, त्यातून कबड्डी व शेख मॅडम असे समीकरण झाले. लहानपणापासून मुस्लिम समाज सुधारक आई हाजी नसीम व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू वडील हाजी इब्राहीम यांचे पाठबळ, पती जावेद शेख सावंतवाडी यांचे प्रोत्साहन तसेच बंधू सुजीत व स्व. शाहीन यांची साथ या बळावर सायराबानू शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनंत अडचणींवर मात करून क्रीडा प्रवास यशस्वी केला.
आज त्या देश पातळीवरील खेळाच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या क्रीडा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मार्गदर्शक व पदाधिकारी माननीय राजजी चौधरी, महाराष्ट्र पश्चिमचे अध्यक्ष माननीय विजयराव पुरंदरे, पहिली महिला अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला ताई खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख संघटक म्हणून कार्यरत आहेत.
राज्य कबड्डी असोशिएशनचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पहिली महिला प्रो कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. खेलो इंडियात पंच म्हणून उत्तम कामगिरी केली. शाहूपुरी येथील जिल्हा परिषद सेवकांची गृहनिर्माण संस्थेच्या त्या संचालिका असून, अनेक क्रीडा व सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शक आहेत.
शाहूपुरी येथील आपल्या राहत्या घराच्या जागेतील ०३ गुंठे जमीन कबड्डीच्या सरावासाठी विनामोबदला सर्व सुविधांसह उपलब्ध करून दिल्यामुळे मुलींची मोठी सोय झाली आहे. याबद्दल क्रीडा भारती मंत्री अमृत देशमुख, उपाध्यक्ष महेंद्र गाढवे, मनोज जाधव, कोषाध्यक्ष कडव सर तसेच क्रीडा भारतीच्या सातारा शहर व जिल्हा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सायराबानू शेख मॅडम यांचे अभिनंदन केले आहे. पालक, विद्यार्थिनी, क्रीडा प्रेमी व शाहूपुरीवासियांनी समाधान व्यक्त केले.
‘मी कबड्डी खेळासाठी अन् विशेष करून गरीब गरजू कब्बडी खेळणाऱ्या मुलींसाठी माझ्या परीने शक्य ते प्रयत्न करीतच राहीन’
– सायराबानू शेख मॅडम








