आपल्याला सडपातळच पत्नी हवी, ही बहुतेक सर्व विवाहेच्छू पुरुषांची अट असते, अशी स्थिती आहे. जाड किंवा लठ्ठ महिलांच्या विवाहात त्यांचे वजन ही महत्वाची अडचण असते. त्यामुळे त्यांना वजन उतरविण्याची सूचना केली जाते. तथापि, अफ्रिकेत, सहारा वाळवंटाच्या प्रदेशात एक देश असा आहे, की जेथील पुरुष या नियमाला अपवाद आहेत. या देशात लठ्ठ वधूंनाच सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे जेथे अन्य देशांमधील महिला ‘झीरो फिगर’साठी आकाश-पाताळ एक करत असतात आणि पुरुष सडसडीत महिलांच्याच मागे असतात, तेथे या देशात मात्र, महिला जाणीवपूर्वक वजन वाढविण्याच्या मागे लागलेल्या असतात. अन्यथा त्यांचा विवाह होणे कठीण असते. यामागे एक महत्वाचे कारणही आहे. या देशात अशी एक समजूत आहे, की लठ्ठपणा हा समृद्धी आणि समाधान आणणारा असतो. त्यामुळे आपल्या घरात येणारी वधू ही लठ्ठच असावी, असा बहुतेक विवाहेच्छू तरुणांचा आग्रह असतो.
घरातील महिला लठ्ठ आाहेत, याचा अर्थ हे घर धनधान्याने भरलेले आहे, असे येथे मानले जाते. या देशात ही परंपरा कित्येक शतकांपासून पाळली जात आहे. आजच्या आधुनिक युगातही ती सोडण्यास येथील समाज मुळीच राजी नाही. लठ्ठपणा आणि समृद्धी किंवा भरभराट यांचा असा काही घट्ट मेळ या देशातील लोकांच्या समजुतीत बसला आहे, की ही समजूत सोडण्याची त्यांची इच्छाच होत नाही. त्यामुळे या देशात लठ्ठ वधूंच्या मागणीत किंचितही घट होत नाही. या देशाची लोकसंख्या 45 लाखांच्या आसपास असून बहुतेक लोक हे भटक्या विमुक्त जमातींमधील आहेत. अशा जमाती कधीही एका जागी स्थिर रहात नाहीत. त्यांची वाटचाल सतत होत असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशा जमातींमध्ये लठ्ठपणा फारसा आढळत नाही. पण या देश या तत्वालाही अपवाद असून येथे महिलांचा लठ्ठपणा भूषणास्पद आहे. हा देशाचे हे वैशिष्ठ्या अलिकडच्या काळातच साऱ्या जगापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे जगभरातले लोक या देशाकडे कुतूहलाने पाहतात. बाकी हा देश अत्यंत गरीब असून दुर्लक्षितही आहे. पण या एका वैशिष्ट्यामुळे तो सध्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून राहिला आहे. पण अलिकडच्या काळात काही परिवर्तन होत आहे.









