वृत्तसंस्था/ पॅरिस
वजन काही अतिरिक्त ग्रॅमनी जास्त भरल्याने अपात्र ठरण्याच्या वेदना काय असतात हे माहीत असलेला जपानी ऑलिम्पिक चॅम्पियन रे हिगुचीने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पाठिंबा व्यक्त केला आहे. विनेशला पॅरिस गेम्समध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अंतिम फेरीतून अपात्र करण्यात आले होते.
पुऊषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता असलेल्या हिगुचीला तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीतून केवळ 50 ग्रॅम वजन जास्त असल्याने बाहेर काढण्यात आले होते. अखेरीस त्याला एक प्लेऑफ लढती देखील गमवावी लागली होती आणि उच्च दर्जाचा कुस्तीपटू असूनही त्या वेळी तो त्याच्या स्वगृही झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकला नव्हता.
‘मला तुझ्या वेदना उत्तम प्रकारे समजतात. तसेच 50 ग्रॅम. तुझ्या आजुबाजूच्या आवाजांची काळजी करू नकोस. आयुष्य पुढे जात असते. धक्क्यांतून बाहेर येऊन उभरणे ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. चांगली विश्रांती घे’, असे हिगुचीने विनेशच्या निवृत्तीच्या घोषणेवर टिप्पणी करताना ‘एक्स’वर लिहिले आहे. या जपानी कुस्तीपटूने 57 किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्ण मिळविले. त्यापूर्वी त्याने उपांत्य फेरीत भारताच्या अमन सेहरावतचा पराभव केला.









