प्रेमासाठी कोणतेही बलिदान द्यायला प्रेमीजन सज्ज असतात, असे म्हणण्याची पद्धत आहे. पण तो काळ जुना झाला, असे वाटते. कारण सांप्रतच्या काळातील प्रेमीजन स्वत:च्या प्रेमाचे आणि प्रेमपात्राचे काय करतील हे सांगता येणे कठीण आहे. प्रेम हे आता जन्मोजन्मीचे बंधन राहिलेले नसून, काही दिवसांचे वेळ घालविण्याचे साधन झाले आहे की काय, असे वाटावे, अशा घटना घडताना दिसतात. प्रेमामध्ये धोका आणि त्यानंतर ‘ब्रेकअप’ या बाबी आता नव्या राहिलेल्या नाहीत. पण चीनमध्ये जी घटना घडली आहे, तिला खरोखरच तोड नाही, असे म्हणता येईल. चीनमधील ग्वांगडोंग येथील ही घटना आहे.
येथे एका 17 वर्षांच्या युवतीने 19 वर्षांच्या एका युवकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. परदेशात तुला उत्तम नोकरी लावून देते, असे आश्वासन तिने त्याला दिले. हा युवक तिच्या प्रेमात चांगलाच फसला. तिचा शब्द प्रमाण मानू लागला. तिच्याविना त्याला करमेनासे झाले. जणू तिच्यासाठी तो वेडाच झाला. ती म्हणेल, ते करावयास त्याला कमीपणा वाटेनासा झाला. पण तिच्या मनात त्याच्याविषयी नेमक्या भावना अन् योजना काय होत्या, हे जाणून घेण्याची आवश्यकताच त्याला वाटली आहे. तिच्या प्रेमात तो अक्षरश: अंधळा झाला.
आपल्यात तो पुरता अडकला आहे, हे समजून येताच तिने तिच्या पुढच्या योजना लागू करायला प्रारंभ केला. त्याला म्यानमारमध्ये नोकरी लावून देण्यासाठी तिने त्याला त्या देशात नेले. तेथे गेल्यावर काही दिवसातच तिने त्याला नोकरी लावून देण्याच्या मिषाने चक्क त्याची ‘विक्री’ केली. तिने त्याला ‘गुलाम’ म्हणून विकले. या विक्रीचे तिला 12 लाख रुपये मिळाले. पैसे घेऊन ही युवती चीनला परतली. पुढे तिचा तथाकथित प्रियकर त्या देशात गुंडांच्या ताब्यात सापडला. त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्याला तिथे कोणतेही संरक्षण नव्हते. त्यामुळे पुढचे अनेक महिने त्याला गुंडांच्याच तावडीत काढावे लागले. नंतर त्याला सोडण्यासाठी गुंडांकडून 43 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांनी कशीबशी नातेवाईकांकडून उधार घेऊन ही रक्कम जमा केली आणि म्यानमारमधील त्या गुंडांच्या टोळीकडे जमा करुन त्याची सुटका करुन घेतली. या प्रियकर-प्रेयसीची नावे. सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आल असली, तरी चीनच्या प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच, प्रियकराला विकून आलेल्या पैशात थायलंडचे पर्यटन उरकून चीनमध्ये परतलेल्या या प्रेयसीलाही चीनी पोलिसांनी अटक केली आहे. तेव्हा, असेही प्रेम असू शकते, हे प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे बोलले जात आहे.









