वृत्तसंस्था/ मोहाली
सुशासनासाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे वक्तव्य दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केले आहे. उपराज्यपालांनी रोखल्यावरही मी दिल्लीत भरपूर कामे केली आहेत, यामुळे शासन आणि प्रशासनासाठी नोबेल पुरस्कार मला मिळू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. केजरीवालांनी यापूर्वी स्वत:चे सहकारी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैद यांच्यासाठी भारतरत्न पुरस्काराची मागणी केली होती.
आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते जैसमीन शाह यांचे पुस्तक ‘केजरीवाल मॉडेल’चा पंजाबी भाषेतील अनुवाद सादर करण्यात आला. पंजाबमधील मोहाली येथे आयोजित कार्यक्रमात केजरीवालांनी एक अधिकारी ते नेता होण्यापर्यंतची स्वत:ची कहाणी ऐकविली आणि दिल्लीत स्वत:च्या सरकारने केलेल्या कामकाजाचा उल्लेख केला.
आरटीआय कार्यकर्त्याच्या स्वरुपात मॅगसेसे पुरस्कार विजेते राहिलेले केजरीवाल यांनी स्वत:ला नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरविले. दिल्लीत जितका काळ आमचे सरकार राहिले, आम्हाला केंद्राकडून काम करू देण्यात आले नाही. तरीही आम्ही काम केले. अनेक अडचणी असतानाही आम्ही दिल्लीत अनेक कामे केल्याचा दावा केजरीवालांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले केजरीवाल यांचा केंद्राकडून नियुक्त उपराज्यपालांशी वारंवार संघर्ष होत राहिला.









